रक्षाबंधनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम राबविला.
सेनगाव पोलीस ठाण्यात इयत्ता ६ वी व १० वीच्या विद्यार्थिनींचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम
सेनगाव : रक्षाबंधनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम राबविला. इयत्ता ६ वी आणि १० वीच्या विद्यार्थिनींनी सेनगाव पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले.
जन्मापासून मृत्यूपर्यंत नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे, हा या उपक्रमामागील उद्देश होता. विद्यार्थिनींनी सेनगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सेनगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, पोलीस उपनिरीक्षक रविकिरण खंदारे आणि पोलीस उपनिरीक्षक नागेश शेट्टीवार यांच्यासह बीट अंमलदार व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनींनी राखी बांधली.
याप्रसंगी बोलताना सहायक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी विद्यार्थिनींना संरक्षणाचे आश्वासन दिले. ते म्हणाले, “तुम्ही हयात आहात तोपर्यंत संविधानाने तुम्हाला मोठे सुरक्षा कवच दिले आहे. तुमचे सदैव रक्षण केले जाईल, असे अभिवचन आम्ही संविधानिक पद्धतीने देतो.”
पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या या आश्वासनामुळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. रक्षाबंधनाच्या पारंपरिक सणाला सामाजिक कृतज्ञतेची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.