शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत, तर पदवीधर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने; पेन, डायरी आणि घड्याळ नेण्यावर निर्बंध
पुणे : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानानंतर आज निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण १८२ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांत बंद झाले होते.
नागपूर, अमरावती, पुणे आणि औरंगाबाद येथील लढतींमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही ठिकाणी मित्रपक्षांमधील मैत्रीपूर्ण लढती, बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांमुळे समीकरणे गुंतागुंतीची झाली. त्यामुळे निकालातून कोणत्या आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक आहे, याचे चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
पुण्यात शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत असून पदवीधर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट सामना आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतील उमेदवारांनी प्रचारात जोर लावला होता. दोन्ही मतदारसंघांतील चुरशीमुळे निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.
मतमोजणी केंद्रावर प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. प्रवेशद्वारावर प्रतिनिधींची तपासणी केली जात असून, ओळखपत्र असलेल्या प्रतिनिधींनाही पेन, डायरी आणि कागदपत्रे बाहेर ठेवण्यास सांगितले जात आहे. घड्याळ घालून आत जाण्यावरून काही प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे.
एका प्रतिनिधीने एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, वाद पोलिसांशी नसून नियोजनातील त्रुटींमुळे झाला. डिजिटल घड्याळ आणि मोबाइलला परवानगी नसल्याचे त्यांना समजले होते; मात्र साधे अॅनालॉग घड्याळही आत नेण्यास रोखण्यात आले, असा त्यांचा दावा आहे. गाडीची चावी आत नेता येणार नसल्याचे सांगितल्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. “मी गाडी तीन किलोमीटर दूर लावून चालत आलो आहे, तर चावी कुठे ठेवायची?” असा सवाल त्यांनी केला.
मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये, यासाठी केंद्राच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निकालांमधून महायुती आणि महाविकास आघाडीच्या ताकदीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.