पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी गावठी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणात फरार असलेला मुख्य आरोपी बाळू लोंढे अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे.
मे महिन्यापासून पोलिसांना देत होता गुंगारा; लोणी काळभोर-ऊरळी कांचन परिसरातून ऊरळी कांचन पोलिसांची कारवाई
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी गावठी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणात फरार असलेला मुख्य आरोपी बाळू लोंढे अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या ऊरळी कांचन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत अटक केली. अटकेनंतर पुढील तपासासाठी बाळू लोंढे याला **गुन्हे अन्वेषण विभाग (CID)**च्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणातील घटना २६ ते २८ मेदरम्यान दापोडी आणि हडपसर परिसरात घडली होती. विषारी हातभट्टीची दारू प्यायल्याने काही जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडून सुरू असून आतापर्यंत १० ते १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
तपास यंत्रणांना या कथित रॅकेटमध्ये आणखी सुमारे २० जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. संबंधितांचा शोध घेण्यासाठी सीआयडीची विविध पथके कार्यरत आहेत. आरोपींकडून जप्त केलेले मोबाइल फोन तसेच अन्य तांत्रिक पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
मे महिन्यापासून पोलिसांना देत होता गुंगारा
घटना घडल्यानंतर बाळू लोंढे फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी सीआयडीसोबत पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे पोलिसांकडूनही प्रयत्न सुरू होते. मात्र, मे महिन्यापासून तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
दरम्यान, बाळू लोंढे लोणी काळभोर आणि ऊरळी कांचन परिसरात असल्याची माहिती ऊरळी कांचन पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मागील काही दिवसांपासून त्याच्यावर गुप्तपणे नजर ठेवून शोधमोहीम सुरू केली. अखेर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवले.
आणखी दोन आरोपींना अटक
या प्रकरणात आर्यन संजीव धोत्रे (२४) आणि कल्पेश अशोक अग्रवाल (२९) यांना मंगळवारी (२५) अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना १ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बाळू लोंढेची या संपूर्ण प्रकरणातील भूमिका, दारूचा पुरवठा करणारे व्यक्ती, त्याच्याशी संबंधित लोक आणि कथित रॅकेटची साखळी याबाबत तपास यंत्रणा त्याची चौकशी करणार आहे. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे अन्य आरोपी आणि संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पेहराव बदलला
फरार असताना पोलिसांच्या नजरेतून बचावण्यासाठी बाळू लोंढेने आपला पेहराव आणि लूक बदलल्याचे तपासात समोर आले आहे. नेहमी दाढी-मिशा ठेवून आणि कपाळावर टिळा लावून दिसणारा बाळू लोंढे फरार असताना दाढी-मिशा काढून मळकट कपड्यांमध्ये फिरत असल्याची माहिती आहे.
ओळख लपवून पोलिसांपासून दूर राहण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, ऊरळी कांचन पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा माग काढण्यात आला आणि अखेर त्याला अटक करण्यात आली.