पुण्यातील सिंहगड रोडवर सकाळच्या गर्दीच्या वेळेत भीषण अपघाताची घटना घडली.
सिंहगड रोडवरील ब्रह्मा हॉटेलसमोर सकाळी 10 वाजता अपघात; बसमधील गर्दीमुळे तोल गेल्याची प्राथमिक माहिती
पुण्यातील सिंहगड रोडवर सकाळच्या गर्दीच्या वेळेत भीषण अपघाताची घटना घडली. PMPML बसमधून रस्त्यावर पडलेल्या तरुणीला मागून येणाऱ्या स्कूल बसची धडक बसून तिचा मृत्यू झाला. सिंहगड रोडवरील ब्रह्मा हॉटेलसमोर सकाळी सुमारे 10 वाजता हा अपघात झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, या अपघाताची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, PMPMLची बस खानापूरहून स्वारगेटच्या दिशेने जात होती. सकाळची वेळ असल्याने बसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होती. ब्रह्मा हॉटेलसमोर बस पोहोचली असताना गर्दीत तरुणीचा तोल गेला आणि ती बसमधून थेट रस्त्यावर पडली.
याचदरम्यान त्याच मार्गावरून एक स्कूल बस मागून येत होती. रस्त्यावर पडलेल्या तरुणीला स्कूल बसची धडक बसली आणि ती बसच्या चाकाखाली आली. या अपघातात तरुणीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते. संबंधित यंत्रणांना अपघाताची माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान, तरुणी बसमधून नेमकी कशी पडली, बसमध्ये असलेली गर्दी यासाठी कारणीभूत होती का आणि त्यानंतर झालेल्या अपघाताची नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.