पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ५ ऑक्टोबरला दिली होती भेट; आज एक्स पोस्टद्वारे राज ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून, येत्या काही दिवसांत सकारात्मक बातमी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. एक्सवरील पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत पुढे काय निर्णय होणार, याकडे विद्यार्थ्यांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पेपरफुटीच्या मुद्द्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनात MPSC विद्यार्थ्यांनी विविध मागण्या मांडल्या आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व रोहित पवार करत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध नेते आंदोलनस्थळी भेट देत असून, तेथे आपापली भूमिका मांडत आहेत. मंत्री नितेश राणे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती.
५ ऑक्टोबरला राज ठाकरेंनी दिले होते आश्वासन
MNS अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ५ ऑक्टोबर रोजी पुण्यातील आंदोलनस्थळी भेट देऊन MPSC विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती देत त्यांनी या विषयावर पुढाकार घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा; राज ठाकरेंची एक्स पोस्ट
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे”
सस्नेह जय महाराष्ट्र, ५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राहणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते. म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा. राज ठाकरे ।
— Raj Thackeray (@RajThackeray) October 9, 2026
या पोस्टमधून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय किंवा घोषणा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत अद्याप नेमका कोणता निर्णय होणार, याची माहिती समोर आलेली नाही.
MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारकडून काय पावले उचलली जातात आणि नोकऱ्यांच्या प्रश्नावर कोणती घोषणा होते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.