बदाम, काळे मनुके आणि डाळींचा समावेश; अन्न सुरक्षा आणि पॅकिंगवरील लेबलिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा संशय
पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खाद्यपदार्थ आणि सुकामेव्याची मागणी वाढत असतानाच, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे विभागात मोठी कारवाई केली आहे. एफडीएच्या पथकांनी एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तब्बल 1 हजार 329 किलो संशयास्पद खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे संबंधित व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या छापेमारीत अधिकाऱ्यांनी 358 किलो बदाम, 493 किलो काळे मनुके आणि 478 किलो डाळीचा साठा ताब्यात घेतला. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील तरतुदींचे तसेच खाद्यपदार्थांच्या पाकिटांवरील आवश्यक लेबलिंग नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची एकूण बाजारभावानुसार किंमत 6 लाख 58 हजार 275 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. दिवाळीच्या काळात मिठाई, बदाम, मनुके आणि अन्य सुकामेव्याला मोठी मागणी असते. या वाढत्या मागणीचा फायदा घेऊन काही विक्रेत्यांकडून निकृष्ट दर्जाचे किंवा आवश्यक परवान्यांशिवाय खाद्यपदार्थ विक्रीस आणले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे एफडीएने बाजारपेठांमधील अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आहे.
खाद्यपदार्थ खरेदी करताना मुदत आणि बॅच क्रमांक तपासा
सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत अन्न व औषध प्रशासनाने ग्राहकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मिठाई किंवा सुका मेवा खरेदी करताना पॅकिंगवरील उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि बॅच क्रमांक तपासूनच खरेदी करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच, बाजारात भेसळयुक्त किंवा संशयास्पद खाद्यपदार्थ आढळल्यास नागरिकांनी तातडीने एफडीए प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळीच्या काळात अशा प्रकारच्या तपासण्या आणि धडक कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.