रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी निघालेल्या भोर कुटुंबाचा प्रवास चाकणजवळील वासुली येथे दुर्दैवी ठरला.
चाकणजवळील वासुली येथे भीषण अपघात; ४७ वर्षीय राजेंद्र भोर आणि १४ वर्षीय मयूरीचा जागीच मृत्यू, अपघात CCTVमध्ये कैद
पुणे : रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी निघालेल्या भोर कुटुंबाचा प्रवास चाकणजवळील वासुली येथे दुर्दैवी ठरला. पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव अवजड वाहनाखाली दुचाकी आल्याने झालेल्या भीषण अपघातात राजेंद्र भोर (वय ४७) आणि त्यांची १४ वर्षीय मुलगी मयूरी भोर यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मयूरीची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील रहिवासी राजेंद्र भोर हे पत्नी आणि मुलगी मयूरीसह मोटरसायकलवरून चाकणनजीकच्या वासुली परिसराकडे जात होते. पुणे-नाशिक महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांची दुचाकी अचानक एका भरधाव अवजड वाहनाच्या खाली आली.
धडक इतकी भीषण होती की राजेंद्र भोर आणि मयूरी भोर हे दोघेही वाहनाच्या चाकाखाली आले. या दुर्घटनेत दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या मयूरीच्या आईला तातडीने चाकण येथील स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
भावाला राखी बांधण्यासाठी निघालेली मयूरी; प्रवास ठरला अखेरचा
रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी मयूरी आनंदाने निघाली होती. मात्र, वासुली परिसरात झालेल्या भीषण अपघाताने तिच्यासह वडील राजेंद्र भोर यांचा जीव घेतला. सणाच्या दिवशीच भोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने अवसरी आणि वासुली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चाकणमधील अपघातांच्या मालिकेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेनंतर चाकण परिसरातील वारंवार होणाऱ्या जीवघेण्या अपघातांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. परिसरातील वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांच्या परिस्थितीबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासने दिली जात असली, तरी अपघातांची मालिका कायम असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
निष्पाप नागरिकांचे बळी जाणाऱ्या या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कधी करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.