Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Political Activists

भगव्या-निळ्याचे शिलेदार असे अकाली जाणे...

चिखली तालुक्यात गत आणि चालू आठवड्यात घडलेल्या तीन दुःखद घटनांनी राजकीय, सामाजिक तसेच चळवळीतील कार्यकर्त्यांना अंतर्मुख केले आहे.


भगव्या-निळ्याचे शिलेदार असे अकाली जाणे

Political Activists |

पक्ष, संघटना आणि चळवळीतील नव्या कार्यकर्त्यांसाठी चिंतनाचा विषय!

चिखली : चिखली तालुक्यात गत आणि चालू आठवड्यात घडलेल्या तीन दुःखद घटनांनी राजकीय, सामाजिक तसेच चळवळीतील कार्यकर्त्यांना अंतर्मुख केले आहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रकाश जाधव, माजी तालुकाप्रमुख विश्वासराव उर्फ बाळासाहेब खंडागळे आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गवई या चळवळीतून घडलेल्या तीन कार्यकर्त्यांचे अकाली निधन झाले. भगव्या आणि निळ्या विचारधारेचे हे तीनही शिलेदार आपापल्या विचारांशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. मात्र, त्यांच्या जाण्याने एक प्रश्न पुन्हा एकदा समोर उभा राहिला आहे—चळवळीसाठी आयुष्य वाहणाऱ्या कार्यकर्त्याने स्वतःच्या संसाराकडे, आरोग्याकडे आणि भविष्याकडे किती लक्ष द्यावे?

भगव्याचे दोन शिलेदार एकापाठोपाठ गेले!

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रकाश जाधव यांचे वयाच्या अवघ्या ६२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पाठोपाठ माजी तालुकाप्रमुख विश्वासराव उर्फ बाळासाहेब खंडागळे यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. दोघेही आयुष्यभर शिवसेनेसाठी लढले आणि पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहिले. मात्र, त्या संघर्षातून त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात नेमके काय मिळाले? हा प्रश्न आज अनेकांच्या मनात आहे.

प्रकाश जाधव मूळचे तेल्हारा येथील. तारुण्यात उद्योग-व्यवसायासाठी मुंबईला गेले आणि तेथे शिवसेनेच्या विचारांशी जोडले गेले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते शिवसेनेचे कार्यकर्ते बनले. गावाकडे आल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदापर्यंत मजल मारली. विविध व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला; मात्र अपेक्षित आर्थिक स्थैर्य त्यांना लाभले नाही. शेवटपर्यंत संसाराचा गाडा ओढताना ते दिसले.

विश्वासराव उर्फ बाळासाहेब खंडागळे हे धनाढ्य घरातून आलेले नेतृत्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते शिवसेनेचे पाईक बनले. शाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपतालुकाप्रमुख ते तालुकाप्रमुख आणि दोन वेळा पंचायत समिती सदस्य अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली. कपाळी भगवा टिळा, गळ्यात भगवा रुमाल आणि ओठांवर कायम ‘जय महाराष्ट्र’ ही त्यांची ओळख होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील त्यांची ‘शिवकृपा स्टेशनरी’ ही केवळ दुकान नव्हती, तर शिवसैनिकांचे हक्काचे केंद्र होते. तालुक्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणे, त्यांच्या सुख-दुःखात धावून जाणे आणि अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरणे, हेच त्यांचे जगणे होते. धनाढ्य घरातून आलेले हे नेतृत्व राजकारणात नावलौकिक मिळवू शकले; मात्र आर्थिक अर्थाने ‘धनाजी’ होऊ शकले नाही. ही वस्तुस्थितीही नाकारता येत नाही.

गट कोणता, पक्षाचे सध्याचे समीकरण काय, हा प्रश्न येथे महत्त्वाचा नाही. महत्त्वाचे एवढेच की, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या एका हाकेला रणांगणात उतरून संघर्ष केला, ते शिवसेनेचे प्रामाणिक कार्यकर्ते आज एकापाठोपाठ काळाच्या पडद्याआड गेले.

निळ्या चळवळीतील विजय गवई यांचेही निधन

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गवई हे मूळचे अंबाशी येथील एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील पंढरीनाथ गवई चिखलीत हमाली करीत असल्याने कुटुंब चिखलीत स्थायिक झाले. दोन भाऊ, तीन बहिणी, पत्नी मनीषा, मुलगी स्नेहल आणि मुलगा सनी असा त्यांचा परिवार.

गरिबी, संघर्ष आणि सामाजिक अन्याय जवळून पाहिलेला हा माणूस इतरांवरील अन्यायाविरुद्ध लढत राहिला. मात्र, इतरांसाठी लढताना स्वतःच्या आरोग्याकडे, घर-संसाराकडे आणि आर्थिक भविष्याकडे दुर्लक्ष झाले का? हा प्रश्न त्यांच्या जाण्यानंतर अधिक तीव्रतेने समोर येत आहे.

तीन कार्यकर्ते... एकच प्रश्न!

प्रकाश जाधव, विश्वासराव खंडागळे आणि विजय गवई—हे तिघेही वेगवेगळ्या विचारधारेचे होते. दोघे भगव्या विचारांच्या शिवसेनेचे, तर विजय गवई निळ्या आंबेडकरी चळवळीचे. पण तिघांमध्ये एक समान धागा होता—विचाराशी निष्ठा आणि संघर्षाची तयारी!

हे तिघेही निधड्या छातीचे होते. इतरांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध ते समोरच्यावर तुटून पडत. वेळप्रसंगी केसेस अंगावर घेत, प्रस्थापितांचा रोष ओढवून घेत आणि शत्रुत्व पत्करत. सोबतच्या कार्यकर्त्यासाठी आणि विचारासाठी वेळ देत. पण हे सर्व करत असताना स्वतःच्या शरीराच्या भुकेकडे, आरोग्याकडे, कुटुंबाकडे आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाले का, याचाही विचार होणे आवश्यक आहे.

डोळ्यासमोरचे वास्तव शब्दात उतरवताना वाईट वाटते. पण वस्तुस्थिती वर्तमानात समोर यायलाच हवी. कारण अनेकांना भूतकाळातील विषयावरील लेखणीतूनच वर्तमान आणि भविष्याची दिशा ठरवता येऊ शकते.

पक्ष, संघटना आणि चळवळीसाठी आपले आयुष्य वाहणाऱ्या युवकांसाठी आणि नव्या कार्यकर्त्यांसाठी हे चिंतन महत्त्वाचे आहे. संघर्ष करा, विचाराशी प्रामाणिक राहा, अन्यायाविरुद्ध लढा; पण त्याचवेळी आपले आरोग्य, आपला परिवार, संसार आणि आर्थिक भविष्य याकडेही दुर्लक्ष होऊ देऊ नका.

तिघांचेही वय जाण्याचे नव्हते. पक्ष-संघटनेतील त्यांचे कार्य एका टप्प्यावर संपले असेल; पण घरातील, संसारातील आणि कुटुंबाप्रतीच्या जबाबदाऱ्या मात्र अजून शिल्लक होत्या. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कार्यकर्त्यांच्या मनात अनेक वर्षे राहील.

भगव्याचा ‘प्रकाश’ गेला... भगव्याचा ‘विश्वास’ गेला... आणि निळ्या चळवळीतील ‘विजय’ही वेदनांपुढे हरला!

त्यांच्या संघर्षाच्या आठवणी राहतील. त्यांच्या आंदोलनांची चर्चा राहील. त्यांच्या विचारांवरील निष्ठेचा अभिमानही राहील. पण त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना इतक्या अकाली का जावे लागले, या प्रश्नावरही पक्ष, संघटना आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी चिंतन करणे गरजेचे आहे.

कदाचित तेव्हाच या तिन्ही शिलेदारांना दिलेली श्रद्धांजली केवळ शब्दांपुरती न राहता, नव्या पिढीला योग्य दिशा देणारी ठरेल.

कारण विचारांसाठी जगताना माणूस स्वतःलाच हरवून बसू नये... संघर्ष जिंकताना संसारही जपला गेला पाहिजे... आणि चळवळ टिकवताना कार्यकर्त्याचे आयुष्यही टिकले पाहिजे!

भगव्या-निळ्याचे हे तीन शिलेदार निघून गेले... पण त्यांच्या जाण्याने उभा राहिलेला प्रश्न मात्र जिवंत आहे!

Related to this topic: