पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सुरक्षेत वाढ करण्याची विनंती; राजकीय विरोधकांकडून प्रकरणाचा गैरवापर होत असल्याचा मिनाक्षी शिंदेंचा आरोप
ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात आता नवा राजकीय ट्विस्ट आला आहे. या हत्येमागे माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती प्रदीप शिंदे असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांकडून केला जात आहे. दोघांनाही अटक करण्याची मागणी करत विरोधकांनी आंदोलनही केले होते. मात्र, आता याच प्रकरणात मिनाक्षी शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. राम पूर्णेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र दिले असून, पूर्णेकर कुटुंबीयांसह त्यांच्या मदतनीसांच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्याची मागणी केली आहे.
राजकीय विरोधकांवर मिनाक्षी शिंदेंचे गंभीर आरोप
पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात मिनाक्षी शिंदे यांनी ठाण्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, माजी खासदार राजन विचारे, उबाठा गटाचे केदार दिघे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, मनसे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव आणि मनसेचे अभिजित पानसे हे नेते या प्रकरणाचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचा दावा त्यांनी पत्रात केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे. समाजमाध्यमांवर एकतर्फी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. जनआंदोलनांच्या माध्यमातून आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता
गेल्या काही दिवसांतील विरोधी पक्षांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत मिनाक्षी शिंदे यांनी ठाणे शहर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.
या वक्तव्यांमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असून, शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. मागील चार ते पाच दिवसांत काही तणावपूर्ण प्रसंगही घडल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.
या प्रकरणात आपल्यावरही विविध आरोप होत असल्याने राजकीय विरोधकांकडून कोणत्याही थराला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
राम पूर्णेकर आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर आणि त्यांचे कुटुंबीय सध्या मोठ्या मानसिक आघातातून जात आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीत राजकीय विरोधकांकडून या कुटुंबाचा वापर केला जात असल्याचा दावा मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.
राजकीय स्वार्थासाठी काही व्यक्तींकडून पूर्णेकर कुटुंबीयांच्या बाबतीत अनुचित घटना घडवली जाण्याची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
याशिवाय, काही विरोधी नेत्यांचे मुख्य आरोपींशी संबंध असल्याचे संकेत आणि माहिती समोर येत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अलीकडेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्यासोबत खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेले काही आरोपी उपस्थित असल्याचे दिसल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
समाजमाध्यमांवर एकतर्फी माहिती प्रसारित होत असताना काही विरोधी नेत्यांच्या हालचालींमुळे त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचेही मिनाक्षी शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.
पूर्णेकर कुटुंबीयांसह सात जणांना संरक्षण देण्याची मागणी
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांना तसेच या कठीण काळात त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना कोणताही धोका निर्माण होऊ नये, याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मिनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
यासाठी राम पूर्णेकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांसह त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या निकटवर्तीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मिनाक्षी शिंदे यांनी पत्रात राम पूर्णेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांसह दिनेश पवार, अखिलेश पाल, प्रशांत मोटे, आनंद भोईर, किसान तट्टे आणि विवेक पांढरे यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
या सर्वांना सध्या देण्यात आलेल्या पोलीस संरक्षणाचा आढावा घेऊन त्यात तातडीने वाढ करावी, अशी विनंती त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.