धर्मगुरू आ. बाबूसिंग महाराज व महंत सुनील महाराज यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
मानोरा : वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे सुरू असलेल्या विकासकामांच्या दर्जाबाबत आणि बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत दि. २८ ऑक्टोबर रोजी धर्मगुरू आ. बाबूसिंग महाराज व महंत सुनील महाराज यांनी मुंबई येथील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आक्रमक भूमिका मांडली. पोहरादेवी येथे मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याच्या तक्रारी, स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेला मनमानी कारभार आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पोहरादेवी येथील विकासकामांच्या गुणवत्तेची गुणवत्ता नियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती देण्यात आली. स्थानिक अधिकारी व कर्मचारी नेमके कोणाच्या दबावाखाली मनमानी कारभार करीत आहेत, विकासकामांचा दर्जा निकृष्ट का आहे आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने झाला आहे का, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी केली. तसेच माता जगदंबा देवी मंदिराचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
पोहरादेवी हे बंजारा समाजाचे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने येथील विकासकामे दर्जेदार, पारदर्शक आणि नियमानुसार पूर्ण झाली पाहिजेत, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासह विविध प्रश्नांवर चर्चा
यासोबतच बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाचा प्रश्न, समाजात होत असलेली बोगस घुसखोरी, बंजारा साहित्य अकादमी, वनार्टी (VANARTI) संदर्भातील प्रश्न तसेच समाजातील विविध प्रलंबित मागण्यांवरही चर्चा करण्यात आली. एसटी आरक्षणासंदर्भात आत्महत्या केलेल्या बंजारा समाजातील युवकांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत व आवश्यक शासकीय सहाय्य देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या सर्व प्रश्नांवर शासनस्तरावर सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीत समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या वेळी महंत सुनील महाराज, भक्तराज महाराज, भाजपा नेते देविदास राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्हीजेएनटी सेलचे प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड, अक्षय राठोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
तीर्थक्षेत्र पोहरादेवीतील विकासकामांची निष्पक्ष चौकशी, माता जगदंबा देवी मंदिराच्या कामाला गती, बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक आणि आत्महत्या केलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत या प्रमुख मागण्यांवर शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी केली.