वरुड तालुक्यातील जरूड येथील सुनील वागद्रे यांची घटना; कर्जफेडीसाठी बाग विकण्याचा उल्लेख, थकीत देयकांवरून कंत्राटदार संघटनेचा शासनावर आरोप
अमरावती : शासकीय कामांची देयके दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील जरूड येथील कंत्राटदार सुनील वागद्रे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या कामांची जवळपास अडीच कोटी रुपयांची बिले शासनाकडे थकीत असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे कंत्राटदार क्षेत्रात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. वागद्रे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांच्या हाती लागली आहे.
मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत कुटुंबासाठी सूचना
सुनील वागद्रे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत कुटुंबीयांसाठी काही महत्त्वाच्या सूचना नमूद असल्याचे सांगितले जात आहे. लहान भाऊ-बहिणींचे शिक्षण पूर्ण करण्याची आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याची विनंती त्यांनी मोठ्या भावाला केल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच, शासकीय कामांची उर्वरित बिले वसूल करणे, देणी फेडणे आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी बाग विकण्याबाबतही त्यांनी चिठ्ठीत लिहिल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या निर्णयासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी नमूद केल्याची माहिती आहे. या चिठ्ठीतील मजकुराबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दोन वर्षांपासून बिले थकीत; आर्थिक संकटाचा सामना
मिळालेल्या माहितीनुसार, वागद्रे यांनी शासकीय कामे पूर्ण करण्यासाठी स्वतःची रक्कम खर्च केली होती. त्यासाठी सोने आणि शेती गहाण ठेवल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून कामांची बिले प्रलंबित असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.
कामांसाठी गुंतवलेली रक्कम परत न मिळाल्याने कर्जाचा भार वाढल्याचे सांगितले जात आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक पैसे उपलब्ध करून देता येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती, अशी माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
कंत्राटदार संघटनेचा शासनाच्या धोरणांवर निशाणा
सुनील वागद्रे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शासकीय कंत्राटदार संघटनेने बॅनर लावून शासनाच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त केली. या बॅनरवर ‘ही आत्महत्या नसून शासनाने घेतलेला बळी आहे’ अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.
शासकीय कामांची देयके वेळेवर मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत संघटनेने या समस्येची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. राज्यात सरकारी देयके प्रलंबित राहिल्यामुळे आतापर्यंत नऊ कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचा दावाही संघटनेकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, ज्यांची देयके अद्याप मिळालेली नाहीत, त्यांचे पैसे तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे. सुनील वागद्रे यांच्या मृत्यूचा तपास पोलीस करत असून, थकीत देयके आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात पुढे काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.