शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी ऊस परिषद, पाणी परिषद घेणार; आ. सईद खान यांची घोषणा
पाथरी (Pathri Shiv Sena Meeting) : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांसमोर निर्माण झालेल्या अडचणी, शेतीमालाचे दर, पीककर्ज वाटप आणि जायकवाडीच्या पाणी आवर्तनासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने रविवार २५ ऑक्टोबर रोजी शहरातील जागृत हनुमान मंदिर सभागृहात दुष्काळ आढावा बैठक घेण्यात आली. विधान परिषद आमदार सईद खान यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीत दुष्काळग्रस्त गरजू कुटुंबांना दिवाळीचा शिधा वाटप करण्याचा प्रारंभही करण्यात आला.
बैठकीचे प्रास्ताविक शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनंत वाकणकर यांनी केले. यावेळी पाथरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अलोक चौधरी, जिल्हा परिषदेचे सभापती कृष्णा शिंदे, नगरसेवक उद्धव नाईक आणि परभणी बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, बँकांकडून कर्जवाटप करताना येणार्या अडचणी आणि जायकवाडीच्या पाणी आवर्तनासाठी करावयाचा पाठपुरावा यावर मनोगत व्यक्त केले.
आ. सईद खान यांनी उपस्थितांशी संवाद साधताना, शेतकर्यांच्या कर्जवाटपातील अडचणी दूर करण्यासाठी बँक अधिकार्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले. पाथरी येथील साखर कारखान्याचा प्रश्न आणि उसाच्या दरासाठी पाठपुरावा करण्यात येणार असून यासाठी मराठवाड्यातील आमदारांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिष्टमंडळ नेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकर्यांच्या प्रश्नांवर ऊस परिषद आणि पाणी परिषद घेण्याची घोषणाही त्यांनी केली.
बैठकीला शिवसेना नेते बालाजी कुर्हाडे, नाना टाकळकर, पाथरी बाजार समिती संचालक अशोकराव गिराम, विजय सीताफळे, संतोष गलबे, विनोद लोहगावकर, विष्णुपंत उगले, नगरसेवक अमोल भाले पाटील, साजेद अली, अनिल ढवळे, खालेद चाऊस, यांच्यासह बंटी उगले, विक्रम गायकवाड, पांडुरंग शिंदे आणि वैजनाथ कोल्हे ,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे संचालक, सरपंच, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सोमनाथ शिंदे यांनी तर एल. आर. कदम यांनी आभार मानले.
गरजूंना दिवाळीच्या शिध्याचे वाटप सुरू
दुष्काळामुळे शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने गरजू कुटुंबांना मदत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाठविण्यात आलेला दिवाळीचा शिधा सोमवारपासून गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ बैठकीत आ. सईद खान यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शिधा वाटप करून करण्यात आला. परभणी तालुक्यातील ६२ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.