कुपटा परिसरात मोठ्या झाडांची कत्तल वृक्षसंवर्धन,कारवाईबाबत नागरिकांचा सवाल
परभणी/ कुपटा (Parbhani Tree-Felling Case) : पावसाचे प्रमाण वाढावे, पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी व्हावी, यासाठी शासनाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करून वृक्षलागवड केली जाते. मात्र, दुसरीकडे वर्षानुवर्षे सावली देणार्या मोठमोठ्या झाडांची कत्तल होत असल्याने वृक्षतोड रोखणार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
एकीकडे उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते, तर दुसरीकडे वृक्षतोड सुरू असल्याचे चित्र दिसते. वृक्षलागवडीच्या मोहिमा राबविण्याबरोबरच अस्तित्वातील मोठी झाडे वाचविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यासाठी संबंधित यंत्रणा किती गंभीर आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी कायदे आणि नियम असतानाही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होते का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. बेकायदेशीर वृक्षतोडीच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
शासनाने वृक्षलागवडीपुरते मर्यादित न राहता लावलेल्या रोपांचे संगोपन, झाडांचे संरक्षण आणि बेकायदेशीर वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवावे. संबंधित यंत्रणांनी वृक्षतोडीच्या प्रकरणांची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी नागरिक व्यक्त करत आहेत. झाडे लावणे जितके महत्त्वाचे, तितकेच ती जगवणे आणि अस्तित्वातील झाडांचे संरक्षण करणेही आवश्यक आहे. (Parbhani Tree-Felling Case) वृक्षलागवडीवर खर्च करणार्या शासनाने वृक्षतोड रोखण्यासाठी ठोस कारवाई करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्यक्षात पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वृक्षतोडीचा परिणाम पाणीटंचाईवरही
झाडे पर्यावरणाचा समतोल राखण्यास, मातीची धूप कमी करण्यास आणि जमिनीत पाणी मुरण्यास मदत करतात. त्यामुळे वृक्षतोडीचे दुष्परिणाम भविष्यात जलसुरक्षेवरही होऊ शकतात. अशा परिस्थितीत वृक्षलागवडीवर लाखो रुपये खर्च करताना मोठ्या झाडांची कत्तल रोखण्यासाठीही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.