एसडीएम जिवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड विधानसभा मतदार संघ राज्यात अव्वल
गंगाखेड (Parbhani SIR Campaign) : निवडणुक आयोगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड विधानसभा मतदार संघातील ९६.४२ टक्के मतदारांचे पूर्ण करून हा मतदार संघ राज्यात अव्वलस्थानी आला आहे.
निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरात सुरु झालेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत गंगाखेड विधानसभा मतदार संघातील गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करत परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. यशाचा हा आलेख कायम ठेवत गंगाखेड विधानसभा मतदार संघाची मतदार यादी अचूक व अद्यावत करण्यासाठी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी जिवराज डापकर यांनी केलेल्या मार्गदर्शनातुन गंगाखेड तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे, पालम तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, पूर्णा तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार अशोकराव केंद्रे, नायब तहसीलदार विनोद पवार, नायब तहसीलदार पी. एस. शिंदे, गटविकास अधिकारी अक्षय सुक्रे, प्रा.शि. किशोर मस्के, सहा महसूल अधिकारी उपेंद्र करवंदे, सहा महसूल अधिकारी प्रकाश आय्या, सहा महसूल अधिकारी व्यंकटेश जज्जरवार, महसूल सहाय्यक राफे अंसारी, संगणक चालक प्रेम गोडबोले, अरविंद पंडीत, संजय वाघमारे आदींसह तिन्ही तालुक्यातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, सहाय्यक मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, कृषी सहाय्यक, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शिपाई, महसूल सेवक (कोतवाल), पोलीस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका, स्वस्त धान्य दुकानदार व गंगाखेड विधानसभा मतदार संघातील सर्व राजकीय पक्षांचे मतदान केंद्र स्तरीय प्रतिनिधी आदींनी सुरुवातीपासून अथक परिश्रम घेत या मोहिमेत गंगाखेड विधानसभा मतदार संघातील ४१७४८१ मतदारांचे (मॅपिंग) मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) करत ९६.४२ टक्के काम पूर्ण करून अव्वल स्थानी राहण्याचा आलेख कायम ठेवत महाराष्ट्र राज्यात ही प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. गंगाखेड विधानसभा मतदार संघाने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
सर्वांच्या प्रयत्नाने राज्यात अव्वलस्थान कायम ठेवला - एसडीएम डापकर
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत गंगाखेड विधानसभा मतदार संघातील गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्याच्या तहसीलदारांसह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेत ९६.४२ टक्के काम पूर्ण केल्याने प्रथम परभणी जिल्हा, मराठवाडा व आता महाराष्ट्र राज्यात ही अव्वलस्थान कायम राहिल्याचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी जिवराज डापकर यांनी दैनिक देशोन्नती शी बोलतांना सांगितले.