शेतीच्या वादातून दाम्पत्यावर कोयता, लोखंडी पाइप व गजाने हल्ला
पत्नीचा मृत्यू, पतीची प्रकृती चिंताजनक
पाथरी (Parbhani Kherda Murder Case) : शेतीच्या वादातून निर्माण झालेल्या भावकीतील वैमनस्याचे पर्यवसान रक्तरंजित हल्ल्यात होऊन खेर्डा येथे एका महिलेचा बळी गेला तर तिचा पती मृत्यूशी झुंज देत आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोमवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री पाथरी तालुक्यातील खेर्डा येथे घडलेल्या या हत्याकांडाने गावासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उर्मिला लक्ष्मण सिताफळे ( वय ४२) असे मृत महिलेचे नाव असून त्यांचे पती लक्ष्मण सिताफळे हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
शेतातील वादातून संघर्षाची ठिणगी
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, सोमवारी शेतातील सोयाबीनचा ढीग जाळल्याच्या कारणावरून वाद झाल्याने व शेतरस्त्याच्या प्रश्नावरूनही पूर्वीचा संबंधितांमध्ये वाद असल्याने दिवसभरातील वादानंतर रात्री सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास खेर्डा येथे लक्ष्मण आणि उर्मिला सिताफळे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती गावातील एका व्यक्तिने फिर्यादी मीरा सिताफळे यांना फोनवरून दिली. ही (Parbhani Kherda Murder Case) बातमी समजताच मीरा यांनी खेर्डा गावाकडे धाव घेतली. तेथे तुकाराम कुंडलिक सिताफळे यांच्या घरासमोरील रस्त्यावर लक्ष्मण आणि उर्मिला हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. दोघांच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या.
फिर्यादीतील आरोपानुसार, तुकाराम कुंडलिक सिताफळे याने कोयत्याने, वैजनाथ कुंडलिक सिताफळे याने लोखंडी पाइपने, तर लक्ष्मीबाई कुंडलिक सिताफळे यांनी लोखंडी गजाने दोघांवर हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर, गळ्यावर, मानेवर, हातांवर तसेच शरीराच्या इतर भागांवर वार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ग्रामस्थांची धावपळ; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही गंभीर जखमींना पाथरी येथील वरद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान उर्मिला सिताफळे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. (Parbhani Kherda Murder Case) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, पती लक्ष्मण सिताफळे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिन्ही आरोपींना अटक; चार दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणी मीरा माणिक सिताफळे यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्मिला सिताफळे यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी गुन्ह्यात खुनाच्या कलमाची वाढ केली. (Parbhani Kherda Murder Case) हल्ल्यात वापरण्यात आलेला कोयताही जप्त करण्यात आला असून हत्यार कायद्यानुसारही कारवाई करण्यात आली आहे. या हत्याकांडातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून मंगळवार २० ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शेतीच्या वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेचा पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहेत.