Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > नाशिक

Onion Express

नाशिकहून चेन्नईकडे धावणार 800 टनांची ‘कांदा एक्सप्रेस’; दर घसरण्याच्या शक्यतेने शेतकरी नाराज

कांद्याच्या वाढलेल्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडून बफर स्टॉकमधील कांदा देशातील विविध बाजारपेठांमध्ये पाठवला जात आहे.


नाशिकहून चेन्नईकडे धावणार 800 टनांची ‘कांदा एक्सप्रेस’ दर घसरण्याच्या शक्यतेने शेतकरी नाराज

Onion Express |

मनमाड स्थानकातून 21 बोगींमध्ये कांदा भरण्याचे काम सुरू; फडणवीसांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

नाशिक : कांद्याच्या वाढलेल्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडून बफर स्टॉकमधील कांदा देशातील विविध बाजारपेठांमध्ये पाठवला जात आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून साठवण्यात आलेल्या कांद्याची वाहतूक आता रेल्वेने सुरू झाली आहे. लासलगावहून दिल्लीला पहिली कांदा एक्सप्रेस रवाना झाल्यानंतर आता मनमाडहून 800 मेट्रिक टन कांदा चेन्नईला पाठवण्यात येणार आहे.

मनमाड रेल्वे स्थानकातील मालधक्क्यावर कांदा रेल्वेच्या 21 बोगींमध्ये भरण्याचे काम सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाफेड आणि एनसीसीएफच्या गोदामांमध्ये साठवलेला कांदा ट्रकच्या माध्यमातून मनमाडला आणला जात आहे. हे लोडिंग पूर्ण झाल्यानंतर कांदा एक्सप्रेस संध्याकाळपर्यंत चेन्नईच्या दिशेने रवाना होण्याची माहिती आहे.

लासलगावनंतर आता मनमाडहून कांदा एक्सप्रेस

कांद्याचे बाजारभाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बफर स्टॉकमधील कांदा देशाच्या विविध भागात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी लासलगाव रेल्वे स्थानकातून 450 मेट्रिक टन कांदा घेऊन पहिली एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना झाली होती. त्यानंतर आता मनमाडमधून 800 मेट्रिक टन कांदा चेन्नईला पाठवला जात आहे.

मनमाडमध्ये सुरू असलेल्या लोडिंग प्रक्रियेदरम्यान बफर स्टॉकमधील काही कांदा हलक्या प्रतीचा आणि खराब अवस्थेतील असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सरकारकडून मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात पाठवला जात असल्याने बाजारभाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

कांदा एक्सप्रेसवरून आधीही झाला होता विरोध

बफर स्टॉकमधील कांदा बाहेरच्या राज्यांमध्ये पाठवण्यावरून शेतकऱ्यांकडून यापूर्वीही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी लासलगावहून दिल्लीच्या दिशेने कांदा एक्सप्रेस रवाना होत असताना प्रहारच्या तालुका अध्यक्षांकडून ही गाडी अडवण्यात आली होती.

दरम्यान, केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर नियंत्रणात येण्याची शक्यता असली तरी बाजारभावात घसरण झाल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

फडणवीसांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारे प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर यांना चांदवड येथील त्यांच्या राहत्या घरातून स्थानबद्ध करण्यात आले आहे.

तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख शिवा सुराशे यांनाही सुरक्षेच्या कारणास्तव लासलगाव पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती आहे.

कांद्याच्या दरावर आता सर्वांचे लक्ष

एकीकडे कांद्याचे वाढलेले दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून बफर स्टॉक बाजारात आणला जात आहे, तर दुसरीकडे दर घसरल्यास त्याचा फटका कांदा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनमाडहून चेन्नईला रवाना होणाऱ्या 800 टन कांदा एक्सप्रेसकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: