राज्यभर प्रत्यक्ष दौरे करून भटक्या विमुक्तांच्या मूलभूत प्रश्नांचा अभ्यास करून ठोस उपाययोजना करण्याची मागणी
मंत्री संजय राठोड यांच्या मागणीला यश; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे समिती स्थापन करण्याचे निर्देश
मानोरा (Nomadic and De-notified Tribes Committee) : महाराष्ट्र राज्यातील भटक्या विमुक्त, अर्धभटक्या व पशुपालक समाजाच्या प्रलंबित प्रश्नांचा सर्वंकष अभ्यास करून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शिंदे समितीच्या धर्तीवर निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी कॅबिनेट मंत्री, मृद व जलसंधारण मंत्री तथा शिव भटके विमुक्त (DNT) सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय राठोड यांनी ओबीसी उपसमितीच्या बैठकीत केली.
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत ओबीसी समाजाशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना भटक्या विमुक्त जमातींच्या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रश्नांकडे मंत्री संजय राठोड यांनी शासनाचे लक्ष वेधले. “आजही भटक्या विमुक्तांना अंत्यसंस्कारासाठी जागा नाही” भटक्या विमुक्त समाजाची आजची सामाजिक परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट करताना मंत्री संजय राठोड यांनी पुणे येथील एका भटक्या जमातीच्या पालातील अत्यंत वेदनादायी घटना बैठकीत मांडली. पुणे परिसरातील भटक्या समाजाच्या पालात एका वृद्ध महिलेचे निधन झाले. मात्र त्या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी स्थानिक पातळीवर जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. देवभूमी असल्याचे कारण देत मृतदेह जाळण्यास विरोध करण्यात आला. अखेर पहाटेच्या वेळी त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर संबंधित कुटुंबांनी आपली पाल-झोपडी उचलून तेथून निघून जाण्याची वेळ आली.
ही केवळ एका कुटुंबाची घटना नसून, आजही भटक्या विमुक्त समाजाला भेडसावणाऱ्या मूलभूत सामाजिक, मानवी आणि नागरी हक्कांच्या प्रश्नांचे वास्तव चित्र आहे, असे मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले.
कंजरभाट समाजाचा प्रश्नही बैठकीत उपस्थित
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व ओबीसी प्रश्नांचे अभ्यासक मा. लक्ष्मण हाके यांनी कंजरभाट समाजाच्या समस्यांकडेही बैठकीचे लक्ष वेधले. जात प्रमाणपत्र, स्थायिक होण्याचा प्रश्न, निवास, शिक्षण, रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि मूलभूत नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांमुळे भटक्या विमुक्त समाजातील अनेक कुटुंबे आजही वंचित आहेत. पशुपालक भटक्या समाजाच्या समस्यांवरही चर्चा भटक्या विमुक्त समाजातील पशुपालक कुटुंबांचे प्रश्नही बैठकीत गांभीर्याने मांडण्यात आले. गाय, मेंढी, बकरी आदी पशुधनावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांची सततची भटकंती, चराईची जागा, निवासाची व्यवस्था, पशुधनासाठी पाणी, आरोग्य सुविधा, शासकीय योजनांचा लाभ, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या अनेक समस्या अद्याप कायम आहेत.
भटकंतीमुळे अनेक कुटुंबांकडे कायमस्वरूपी पत्ता नसतो. त्यामुळे रेशन कार्ड, आधारशी संबंधित सुविधा, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, घरकुल, शैक्षणिक प्रवेश आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळविताना अडचणी निर्माण होतात. या सर्व प्रश्नांचा एकत्रित आणि वस्तुनिष्ठ अभ्यास होणे गरजेचे आहे.
दादा इदाते समितीच्या शिफारशींचाही उल्लेख
बैठकीत मा. पंकजाताई मुंडे यांनी भटक्या विमुक्त समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी यापूर्वी करण्यात आलेल्या दादा इदाते समितीचा उल्लेख केला. या समितीने मांडलेल्या बाबी, उपलब्ध अहवाल आणि शिफारशींचा अभ्यास करून आजच्या परिस्थितीनुसार पुढील दिशा निश्चित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
शिंदे समितीच्या धर्तीवर स्वतंत्र समितीची मागणी
मंत्री संजय राठोड यांनी स्पष्टपणे सांगितले की, भटक्या विमुक्त जमातींच्या प्रश्नांकडे केवळ कागदोपत्री किंवा प्रशासकीय दृष्टीने न पाहता प्रत्यक्ष समाजामध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शिंदे समितीच्या धर्तीवर निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करावी, या समितीने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष दौरे करावेत, पालांमध्ये, वस्त्यांमध्ये, तांड्यांमध्ये, पशुपालकांच्या ठिकाणी जाऊन समाजाच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि शासनाला कालबद्ध स्वरूपात शिफारशी सादर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तातडीने समिती स्थापन करण्याचे निर्देश या मागणीची गंभीर दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भटक्या विमुक्त जमातींसाठी समिती स्थापन करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच मंत्री अतुल सावे यांनीही ही समिती लवकरात लवकर स्थापन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल, असे बैठकीत स्पष्ट केले. भटक्या विमुक्त समाजासाठी ऐतिहासिक पाऊल मंत्री संजय राठोड यांनी ओबीसी उपसमितीसमोर भटक्या विमुक्त समाजाच्या मूलभूत प्रश्नांना ठोसपणे व प्रभावीपणे मांडले.
त्यांच्या मागणीला शासन स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळून स्वतंत्र समिती स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. ही समिती स्थापन झाल्यानंतर भटक्या विमुक्त समाजाच्या जात प्रमाणपत्र, निवास, घरकुल, जमीन व घरपट्टे, अंत्यसंस्कारासाठी जागा, शिक्षण, रोजगार, आरोग्य, पशुपालन, चराई, शासकीय योजनांचा लाभ, कागदपत्रे, सामाजिक सुरक्षा आणि राजकीय व प्रशासकीय प्रतिनिधित्व अशा विविध प्रश्नांचा सर्वंकष अभ्यास होण्याची अपेक्षा आहे.
भटक्या विमुक्त समाज हा आजही अनेक ठिकाणी पाल, तांडे, वस्त्या आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या तात्पुरत्या निवासांमध्ये जीवन जगत आहे. एका ठिकाणी स्थायिक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा आणि कागदपत्रांचा अभाव असल्यामुळे त्यांची पुढची पिढीही अनेकदा शिक्षण आणि विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहते. त्यामुळे “भटक्या विमुक्त समाजाचा प्रश्न हा केवळ एका विभागाचा किंवा एका खात्याचा प्रश्न नसून सामाजिक न्याय, मानवाधिकार, शिक्षण, महसूल, ग्रामविकास, पशुसंवर्धन आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित व्यापक प्रश्न आहे,” अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.
मंत्री संजय राठोड यांनी मांडलेल्या मागणीमुळे भटक्या विमुक्त समाजाच्या प्रश्नांना शासनाच्या उच्चस्तरीय चर्चेत महत्त्व प्राप्त झाले असून, स्वतंत्र समिती स्थापन करण्याच्या निर्णयामुळे समाजाच्या दीर्घकालीन प्रश्नांच्या अभ्यासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. भटक्या विमुक्त समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी मांडलेल्या या मागणीला मिळालेले यश हे समाजाच्या संघर्षातील महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रमुख मागण्या:
- शिंदे समितीच्या धर्तीवर भटक्या विमुक्त जमातींसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी.
- समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नियुक्ती करावी.
- समितीने राज्यभर प्रत्यक्ष दौरे करून पाल, तांडे व वस्त्यांमध्ये जनसुनावणी घ्यावी.
- दादा इदाते समितीच्या अहवालाचा व शिफारशींचा अभ्यास करावा.
- जात प्रमाणपत्र व आवश्यक शासकीय कागदपत्रांच्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.
- भटक्या कुटुंबांना घरकुल, जमीन/घरपट्टे व स्थायिक होण्यासाठी आवश्यक सुविधा द्याव्यात.
- अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रश्न सोडवावा.
- पशुपालक भटक्या समाजासाठी चराई, पाणी, निवास व पशुधनाच्या संरक्षणाची व्यवस्था करावी.
- भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, वसतिगृहे, शिष्यवृत्ती व कौशल्य विकासाच्या सुविधा वाढवाव्यात.
- समितीने निश्चित कालावधीत शासनाला कृतीशील अहवाल सादर करून त्यावर शासनाने कालबद्ध निर्णय घ्यावा.