नक्षलमुक्त गोंदिया जिल्ह्याचा राष्ट्रीय गौरव
स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे होणार्या सोहळ्यात सहभाग
गोंदिया (Naxal-free Gondia district) : भारताचे लोहपुरुष आणि देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी गुजरात राज्यातील एकता नगर (केवडिया) येथे भव्य राष्ट्रीय एकता दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमधून प्रत्येकी ५० नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ गुजरात येथे आमंत्रित करण्यात आले आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील ५० नागरिकांचा समावेश असून, या प्रतिनिधी मंडळाच्या सहभागामुळे जिल्ह्याच्या नक्षलमुक्तीच्या प्रवासाला आणि शांतता, विकास अन् राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्याचा संदेश देणार्या या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष उपक्रमांतर्गत पूर्वी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या समन्वयातून या प्रतिनिधी मंडळाच्या गुजरात दौर्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या (Naxal-free Gondia district) दौर्याच्या पहिल्या टप्प्यात २७ ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते (नक्षल सेल, गोंदिया) यांच्यासोबत ३ नागरिकांना एकता नगर, गुजरात येथे पाठविण्यात आले असून त्यांचा २ दिवसांचा गुजरात दर्शनाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे आणि दीपक तरवडे यांच्या समवेत उर्वरित ४७ नागरिकांना गुजरात येथे रवाना करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया दिनेश शुक्ला यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या ताफ्याच्या प्रवासाची सुरुवात करण्यात आली. अशा प्रकारे गोंदिया जिल्ह्यातून एकूण ५० नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ या ऐतिहासिक राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यात सहभागी होत आहे.

अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भागांमध्ये रस्ते, मोबाईल नेटवर्क, वीज, पाणी, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक तसेच इतर मूलभूत सुविधांचा विस्तार झाल्यामुळे नागरिकांचा शासनाशी संपर्क अधिक दृढ झाला आहे. विकासाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचू लागल्याने ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. या परिवर्तनामध्ये गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्पेâ राबविण्यात येणार्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ या अभिनव कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या ऐतिहासिक उपक्रमाबद्दल गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिनिधी मंडळाने केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, संबंधित यंत्रणा आणि विशेषतः पोलीस दलाचे आभार मानले आहेत.
नक्षलमुक्त गोंदिया, सुरक्षित गोंदिया आणि विकसित गोंदिया या संकल्पनेला बळ देत जिल्ह्यात शांतता, विश्वास आणि विकासाची वाटचाल अधिक दृढ करण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे.
-गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया