टर्मिनल-१च्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी काही विमानसेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू करण्यात आल्या आहेत.
टर्मिनल-१च्या दुरुस्तीमुळे बदल; दिल्ली, बेंगळुरू आणि कोचीच्या प्रवाशांना अतिरिक्त प्रवासाचा फटका
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्यासोबतच टर्मिनल-१च्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी काही विमानसेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, या बदलाचा थेट परिणाम प्रवाशांच्या प्रवासावर होत असून, नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि कसरत करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या दिल्ली, बेंगळुरू आणि कोचीकडे जाणाऱ्या काही विमानांच्या उड्डाणस्थळात बदल करण्यात आला आहे. सकाळच्या वेळेतील दिल्ली व बेंगळुरूची तसेच दुपारची कोचीला जाणारी काही उड्डाणे नवी मुंबई विमानतळावरून संचालित केली जात आहेत. त्यामुळे विमानाचे तिकीट बुक करण्यापूर्वी प्रवासी आणि पर्यटन व्यावसायिकांकडून विमान कोणत्या विमानतळावरून सुटणार आहे, याची खात्री केली जात आहे. भविष्यात अशा उड्डाणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी स्वतःचे वाहन असलेल्या प्रवाशांना काही प्रमाणात सुविधा उपलब्ध होत असली, तरी ठाणे, पूर्व उपनगरे आणि मुंबईतील इतर भागांतून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळ गाठणे मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना नाइलाजास्तव नवी मुंबईपर्यंतचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान, मुंबई-दिल्ली मार्गावरील एअर इंडिया एक्स्प्रेस, इंडिगो आणि अकासा एअरच्या काही विमानांचे उड्डाण सध्या नवी मुंबईहून होत आहे. सकाळची ही उड्डाणे दिल्लीतील एकदिवसीय बैठका तसेच कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी सोयीची होती. मात्र, विमानतळ बदलल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना आता साधारण एक ते दीड तास अतिरिक्त प्रवास करावा लागत असल्याचे ते सांगत आहेत.
पर्यटन क्षेत्रावरही या बदलाचा परिणाम जाणवत आहे. अकासा एअरचे सकाळी ११.३० वाजता मुंबईहून कोचीला जाणारे विमान पर्यटकांमध्ये लोकप्रिय होते. मात्र, हे उड्डाण नवी मुंबईला हलवल्यानंतर पर्यटक तेथून प्रवास करण्यास नकार देत असल्याचे पर्यटन व्यावसायिक योगेश लेले यांनी सांगितले. मुंबईतून उपलब्ध असलेल्या पर्यायी विमानसेवेला प्रवाशांची पसंती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एअर इंडिया एक्स्प्रेसचे सकाळचे विमान बेंगळुरू येथे थांबून त्यानंतर दिल्लीला जात होते. त्यामुळे बेंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांसाठीही ही सेवा उपयुक्त ठरत होती. त्याचप्रमाणे इंडिगोचे सकाळी ७.०५ वाजताचे बेंगळुरूचे उड्डाण नवी मुंबई विमानतळावरून सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईच्या टर्मिनल-१सोबतच टर्मिनल-२वरील आणखी काही उड्डाणे नवी मुंबई विमानतळाकडे वळवली गेल्यास प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भविष्यातील या बदलांबाबत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून सध्या निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. या प्रस्तावित बदलांची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला देण्यात आली असून, त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दीर्घकालीन काळात मुंबईतील हवाई वाहतुकीवरील भार कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, सध्या विमानतळापर्यंत पोहोचण्याची उपलब्ध वाहतूक सुविधा हा प्रवाशांसमोरील प्रमुख प्रश्न बनला आहे. केवळ नाइलाज म्हणून नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करण्याची वेळ येत असल्यास त्याचा परिणाम विमान कंपन्यांच्या व्यवसायावरही होऊ शकतो, अशी चिंता पर्यटन व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.