नांदेड विभाग आरक्षित रेल्वे

आरक्षित रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना; बोर्डिंग स्टेशन, रिक्त बर्थ व प्रवास विम्याबाबत रेल्वेचे आवाहन

Nanded Division Reserved Railway: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे आरक्षित रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बोर्डिंग स्टेशन, रिक्त बर्थचे वाटप आणि प्रवास विमा सुविधेबाबत महत्त्व

आरक्षित रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना; बोर्डिंग स्टेशन, रिक्त बर्थ व प्रवास विम्याबाबत रेल्वेचे आवाहन

Nanded Division Reserved Railway

हिंगोली (Nanded Division Reserved Railway) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे आरक्षित रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बोर्डिंग स्टेशन, रिक्त बर्थचे वाटप आणि प्रवास विमा सुविधेबाबत महत्त्वाच्या तरतुदी जाहीर करण्यात आल्या असल्याची ही माहिती देण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनी तिकिटावर नमूद केलेल्या बोर्डिंग स्टेशनवरूनच प्रवास सुरू करावा. दुसऱ्या स्टेशनवरून प्रवास करायचा असल्यास दुसरा आरक्षण तक्ता तयार होण्यापूर्वी अधिकृतरित्या बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करणे आवश्यक आहे. अन्यथा तिकीट तपासणी कर्मचारी संबंधित प्रवाशाची हजेरी 'Not Turned Up (NT)' म्हणून नोंदवू शकतात. अशा स्थितीत तिकीट आपोआप रद्द होऊन प्रवास विनातिकीट समजला जाऊ शकतो.

तसेच आरक्षित आसनव्यवस्थेचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी प्रवासी गैरहजर राहिल्यामुळे रिक्त होणाऱ्या बर्थचे वाटप रेल्वेच्या नियमानुसार प्रथम RAC प्रवाशांना आणि त्यानंतर पुढील स्थानकांवरील प्रतीक्षा यादीतील पात्र प्रवाशांना करण्यात येणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत केवळ IRCTC द्वारे ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी असलेली ऐच्छिक प्रवास विमा सुविधा आता 27 ऑक्टोबर 2026 पासून रेल्वे आरक्षण काउंटरवरून (PRS) तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठीही सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा घेण्यासाठी प्रवाशांना तिकिटाच्या भाड्याचे पेमेंट डिजिटल माध्यमातून करणे बंधनकारक असून रोख पेमेंट स्वीकारले जाणार नाही. तसेच मोबाईल नंबर देणे अनिवार्य असून विमा पॉलिसीचे तपशील मोबाईलवर पाठवले जातील.

या विम्यासाठी प्रति प्रवासी 45 पैसे हप्ता आकारला जाईल. एका PNR वरील सर्व प्रवाशांसाठी विमा घेतल्यास तो सर्वांना लागू होईल. ही विमा पॉलिसी गाडी मूळ स्थानकावरून सुटल्यापासून गंतव्य स्थानकावर पोहोचेपर्यंत संरक्षण देईल. यामध्ये रेल्वे अपघात, दहशतवादी कृत्ये, लूटमार किंवा चालत्या गाडीतून पडणे यांसारख्या अनुचित घटनांचा समावेश असेल. प्रवाशांनी तिकिटावरील बोर्डिंग स्टेशन आणि आरक्षणाची स्थिती तपासून घ्यावी व तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.