नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर चोरंबा फाट्याजवळील पेट्रोल पंप परिसरात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.
चोरंबा फाट्याजवळ अज्ञात ट्रकने कारला दिली धडक; कार दुचाकीवर आदळल्याने संदीप पवारांचा मृत्यू
डोंगरकडा : नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर चोरंबा फाट्याजवळील पेट्रोल पंप परिसरात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.
या अपघातात संदीप हिरामण पवार (वय ३०, रा. झुंनझूनवाडी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडकडून वारंगाकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने पुढे जात असलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.
ट्रकची धडक बसल्यानंतर कारवरील नियंत्रण सुटले आणि ती समोरून जात असलेल्या दुचाकीवर जाऊन आदळली. कारची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार संदीप पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
कारमधील सोनखेड येथील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर अज्ञात ट्रकचालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील १०३३ आणि १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
कुटुंबाचा आधार हरपला
मृत संदीप पवार हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.