Labor Awareness Conference: भारतीय रेलवे माल गोदाम श्रमिक संघाच्या महाराष्ट्र प्रदेश इकाई नागपूरच्या वतीने आयोजित एक दिवसीय कार्यकर्ता व श्रमिक जागरूकता सम्मेलन उत्साहपूर्ण वातावरणात
नागपूर (Labor Awareness Conference) : भारतीय रेलवे माल गोदाम श्रमिक संघाच्या महाराष्ट्र प्रदेश इकाई नागपूरच्या वतीने आयोजित एक दिवसीय कार्यकर्ता व श्रमिक जागरूकता सम्मेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवनात झालेल्या या सम्मेलनाला नागपूरसह बालाघाट, गोंदिया, कन्हान, अजनी, वडसा, हिंगणघाट, अमरावती आदी विविध मालगोदामांमधून मोठ्या संख्येने श्रमिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय रेलवे माल गोदाम श्रमिक संघाचे राष्ट्रीय प्रभारी माननीय मनोरंजन कुमार पासवान यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ‘जय जय महाराष्ट्र’ तसेच स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रीय प्रभारी मनोरंजन कुमार पासवान यांनी श्रमिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन केले. EPFO, ESIC, श्रम कायदे, सामाजिक सुरक्षा आणि 4 Labour Code यांसह श्रमिकांच्या हक्कांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. (Labor Awareness Conference) विविध विभागांतील अधिकारी व तज्ज्ञांनी श्रमिकांच्या भविष्य निर्वाह निधी, आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले.

श्रमिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य देत प्रत्येक मालगोदामावर लवकरात लवकर मेडिकल कॅम्प आयोजित करून आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मनोरंजन कुमार पासवान यांनी दिली. तसेच मालगोदाम श्रमिकांचा मागविण्यात आलेला संपूर्ण डेटा शासनाकडे सादर करून श्रमिकांना त्यांच्या हक्कांसाठी न्याय मिळवून देण्याच्या दिशेने संघटना निर्णायक टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यमांशी संवाद साधताना पासवान यांनी सांगितले की, “१९९९ पासून श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू असून राष्ट्रीय महामंत्री अरुण कुमार पासवान यांच्या नेतृत्वाखाली संघटना दिवस-रात्र श्रमिकांच्या हितासाठी काम करीत आहे. हा संघर्ष आता अंतिम टप्प्यात असून श्रमिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी संघटना पूर्ण ताकदीने प्रयत्नशील आहे.”
मध्यप्रदेश प्रभारी रणवीर सिंह यांनी मालगोदाम श्रमिकांचा डेटा तयार करण्यात आला असून त्यामध्ये काही त्रुटी किंवा अपूर्ण माहिती असल्यास ती तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ श्रमिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष उत्तर प्रदेश सुधीर गुप्ता, सहाय्यक श्रम आयुक्त करुणा श्रीबाद, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे नितीन दुर्योधन, भविष्य निर्वाह निधी विभागाचे अधिकारी रिश पत्तलवार, मध्यप्रदेश विभागाचे अध्यक्ष सुनील निगम, शैलेंद्र पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील सरोदे यांनी केले. सम्मेलनाच्या यशस्वितेसाठी शेखर बोरकर, सुनील सरोदे, मंगेश शिंदे-मेश्राम, प्रथमेश सोनटक्के, चंद्रशेखर वैरागडे, शशांक मेंघरे, अश्विनी गुऱ्हारीकर, शुभम कडू, सौरभ वैरागडे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

विविध मालगोदामांमधून आलेल्या श्रमिकांनी सम्मेलनात मोठ्या उत्साहाने सहभाग घेत (Labor Awareness Conference) विविध विषयांचे मार्गदर्शन शांतपणे ऐकून घेतले. “श्रमिक एकता—जिंदाबाद” आणि “भारतीय रेलवे माल गोदाम श्रमिक संघ—जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. श्रमिकांचे हक्क, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि भविष्याची सुरक्षितता यासाठी संघटितपणे लढा देण्याचा निर्धार या सम्मेलनातून व्यक्त करण्यात आला. श्रमिकांची एकजूट हीच त्यांच्या हक्कांची खरी ताकद असून, संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक श्रमिकाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.