मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, पहाटेच्या वेळेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
महिला डब्यात एकटी असल्याची संधी साधून तरुणीचा गळा दाबण्याचा प्रयत्न; वाणगावजवळ झटापटीनंतर संशयित फरार
मुंबई : मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, पहाटेच्या वेळेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. डहाणू रेल्वे स्थानकातून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मेमू लोकलमध्ये एका विद्यार्थिनीवर हल्ला करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीने प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी डहाणू स्थानकातून मेमू लोकल बोरिवलीकडे रवाना झाली. यावेळी महिला डब्यात संबंधित विद्यार्थिनी एकटीच प्रवास करत होती. अन्य महिला प्रवासी नसल्याचे पाहून एका अज्ञात व्यक्तीने महिला डब्यात प्रवेश केला.
डब्यात आल्यानंतर या इसमाने लोकल कुठपर्यंत पोहोचली आहे, अशी विचारणा करत तरुणीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच त्याने अचानक तरुणीचा गळा दाबून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. परिस्थिती ओळखून विद्यार्थिनीने त्याला जोरदार प्रतिकार केला.
स्वतःचा बचाव करताना तरुणीने आरोपीच्या डोळ्यांवर बोटांनी हल्ला केला आणि त्याला मागे ढकलले. त्याचवेळी तिने मदतीसाठी मोठ्याने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून शेजारच्या डब्यातील तसेच परिसरातील प्रवासी घटनास्थळी धावून आले. प्रवाशांनी संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला.
मात्र, वाणगाव स्थानकाजवळ झालेल्या झटापटीदरम्यान संधी साधून आरोपी तेथून पसार झाला. घटनेनंतर विद्यार्थिनीने तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्काळ मदत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे पहाटेच्या वेळी महिला डब्यातून एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोकलमध्ये अशा संवेदनशील वेळेत पोलीस कर्मचारी किंवा सुरक्षा यंत्रणेची उपस्थिती का नव्हती, असा सवालही उपस्थित होत आहे. आता या प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात आणि आरोपीचा शोध कसा घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.