हिंगोली (MLA Santosh Bangar) : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना, अशा परिस्थितीत खाजगी सावकार आणि फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये, जर त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशारा कळमनुरीचे (MLA Santosh Bangar) आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी व त्यानंतर निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांनी खाजगी सावकार, बँका व फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले आहे.
या पार्श्वभूमीवर काही खाजगी सावकार व फायनान्स कंपन्यांचे वसुली कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दमदाटी करत असल्याच्या तक्रारी आमदार बांगर यांच्याकडे आल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत त्यांनी संबंधितांना थेट इशारा दिला.
"शेतकरी आज जगण्याशी लढत आहे. त्याच्या घरात खायला दाणा नाही. अशा वेळी त्याला कर्जासाठी त्रास देणे हे माणुसकीला धरून नाही. जो कोणी शेतकऱ्याला त्रास देईल, त्याला मी सोडणार नाही. प्रशासनानेही यात लक्ष घालावे," असे (MLA Santosh Bangar) बांगर म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा, आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. त्यांच्या या भूमिकेचे शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे. यावेळी ऋतुराज बांगर, कैलास बांगर, नगरसेवक गणेश बांगर, संदीप बांगर, अजय नागरे, वैभव बांगर यांची उपस्थिती होती