हिंगोली (MLA Santosh Bangar) : राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेत भाकर फिरविणार असल्याचे सुतोवाच एकनाथ शिंदे यांनी केल्यापासून शिवसैनिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास हिंगोली सहित परभणी व नांदेड जिल्ह्यात पक्षाला बळ मिळेल, असा आशावाद शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.
तीन दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेना फेरबदल करणार असल्याची चर्चा जोरात आहे. यामुळे हिंगोली चे जिल्हाप्रमुख व कळमनुरीतून दुसर्यांदा निवडून आलेल्या संतोष बांगर यांची वर्णी लागेल अशी, अपेक्षा शिवसैनिक बाळगून आहेत. अकार्यक्षम असलेल्या मंत्र्यांना अर्धचंद्र देऊन तरुण नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे संकेत उपमुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
या धरतीवर आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असा आशावाद शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. हिंगोली सहित लगतच्या जिल्ह्यातून शिवसैनिक व इतर सामान्य लोक आमदार बांगरांकडे नेहमीच मदतीसाठी येत असतात. त्यांच्या चाहत्यांचा सबंध मराठा वाड्यात मोठा वर्ग आहे. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास मराठवाड्यात पक्षाचे बळ वाढेल अशी अपेक्षा शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.