विक्रोळी पूर्वेतील कन्नमवार नगर परिसरात एका बंद दुकानातून महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कन्नमवार नगरातील स्वयंभू गणेश मार्केटमधील घटना; सुनिता गौतम मोरे यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
मुंबई : विक्रोळी पूर्वेतील कन्नमवार नगर परिसरात एका बंद दुकानातून महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्वयंभू गणेश मार्केटमधील विकास कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या मच्छी मार्केटमधील गाळा क्रमांक ५० मध्ये हा मृतदेह आढळला. या महिलेचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास विक्रोळी पोलिसांकडून सुरू आहे.
मृत महिलेची ओळख सुनिता गौतम मोरे (वय ३० वर्षे) अशी झाली आहे. त्या ग्रुप नंबर दोन, टागोर नगर, म्हाडा बिल्डिंगसमोर, बुद्ध विहाराच्या बाजूला, विक्रोळी पूर्व, मुंबई येथे राहत होत्या. विशेष म्हणजे, सुनिता मोरे बेपत्ता असल्याची तक्रार २६ ऑगस्ट रोजी विक्रोळी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.
दरम्यान, विकास कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या मच्छी मार्केटमधील गाळा क्रमांक ५० मध्ये सुनिता मोरे यांचा मृतदेह आढळला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सुनिता मोरे यांच्या मृत्यूमागे घातपात आहे का किंवा मृत्यूचे अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या तपासातून महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.