Hingoli Government Hospital: हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात माणुसकीचे अनोखे दर्शन घडले आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण मुंगळ आणि हिंगोली शहर पोलिसांच्या अथक
हिंगोली (Hingoli Government Hospital) : हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात माणुसकीचे अनोखे दर्शन घडले आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण मुंगळ आणि हिंगोली शहर पोलिसांच्या अथक परिश्रमातून गेल्या काही दिवसांपासून बेवारस म्हणून उपचार घेत असलेल्या अज्ञात रुग्णाच्या नातेवाईकांचा यशस्वी शोध लावण्यात आला आहे.
दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी एका अज्ञात व्यक्तीला अत्यंत गंभीर आणि बेवारस अवस्थेत हिंगोली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला सर्जरी वार्डमध्ये भरती करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले. रुग्ण शारीरिकदृष्ट्या आजारी होताच, शिवाय त्याची मानसिक स्थिती अत्यंत खालावलेली होती. तो पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत असल्याने स्वतःचे नाव, गाव किंवा नातेवाईकांबाबत कोणतीही माहिती देण्यास असमर्थ होता. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी संवाद साधून माहिती मिळवण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नव्हते.
रुग्णाची दुरवस्था पाहून अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण मुंगळ यांनी स्वतः या प्रकरणात विशेष लक्ष घातले. नियमित राउंडवर असताना त्यांनी सर्जरी वार्डमध्ये जाऊन रुग्णाची आस्थेने चौकशी केली. रुग्णाची बिकट मानसिक अवस्था पाहून त्यांनी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील डॉक्टर म्हणून त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. दररोज रुग्णाजवळ जाऊन त्याला विश्वासात घेऊन अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने चर्चा केल्याने त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले. रुग्णाच्या मनातील भीती दूर झाली आणि त्याने आपल्या नातेवाईकांविषयी व मूळ गावाविषयी काही महत्त्वाचे धागेदोरे अधिष्ठातांना दिले.
रुग्णाकडून मिळालेली माहिती अत्यंत अपूर्ण असल्याने नातेवाईकांचा शोध घेणे हे मोठे आव्हान होते. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. मुंगळ यांनी कन्नड पोलीस स्टेशन कंट्रोल रूमशी संपर्क साधून कन्नड तालुक्यात चापानेर नावाचे गाव असल्याची खात्री केली आणि त्या गावात माणिक लक्ष्मण सातदिवे नावाची व्यक्ती राहते का, याची शहानिशा केली. यानंतर त्यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर यांच्याशी संपर्क साधून सर्व परिस्थितीची कल्पना दिली. पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून आपल्या पथकाला बेवारस रुग्णाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याच्या कामावर लावले. मिळालेल्या अपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी विविध ठिकाणी संपर्क साधला. या शोध मोहिमेत डॉ. नितीन पुरोहित, डॉ. सचिन बोधगिरे, डॉ. अंकुश असोले, परिसेविका शिल्पा हिवाळे, रामचंद्र दुधाळकर आणि वैभव खिल्लारे यांनी विशेष परिश्रम घेतले आणि अखेर बेवारस रुग्णाच्या वारसदारांचा व नातेवाईकांचा शोध लावण्यात यश मिळवले.
डॉक्टरांनी दाखवलेली माणुसकी आणि पोलिसांनी दाखवलेली कर्तव्यदक्षता यामुळे एका भरकटलेल्या रुग्णाला त्याचे कुटुंब पुन्हा मिळण्याची वाट मोकळी झाली असून अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण मुंगल आणि पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर यांच्या या संयुक्त आणि मानवतावादी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.