व्हिडिओ व्हायरल झाल्याने लातूरकरांमध्ये संताप
लातूर (Minor Youth Assault Case) : महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन युवकास निर्वस्त्र करून त्याच्या पार्श्वभागावर पेट्रोलजन्य पदार्थ टाकून काडीपेटी मागत त्या युवकाच्या पार्श्वभागावर बेल्ट ने मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची तात्काळ दखल घेत पोलिसांनी अवघ्या काही तासात मारहाण झालेल्या तरुणाचा शोध घेत या प्रकरणात एका आरोपीस गजाआड केले. मात्र या (Minor Youth Assault Case) प्रकरणातील इतर आरोपी फरार झाले आहेत. इतर तीन आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. आरोपी हे लातूर भोवतीच्या रायवाडी, वरवंटी आणि तांदुळवाडी येथील असल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोशल मीडियावर एक व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला. एका निर्जनस्थळी अल्पवयीन युवकास निर्वस्त्र करून त्यास आडवे पाडून त्याच्या पार्श्वभागात पेट्रोलजन्य पदार्थ ओतून काडीपेटी मागत असल्याचे त्या व्हिडिओत व्हायरल झाले. शिवाय त्या युवकस बेल्टने मारहाण करीत असल्याचे त्या व्हिडिओत व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले. समाज माध्यमातून तात्काळ कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची चर्चा करून जिल्ह्यातील पोलिसांच्या ढिसाळ कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.
मात्र, ही बाब निदर्शनास येताच लातूर एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ दखल घेत (Minor Youth Assault Case) पीडित मुलाचा शोध घेतला. झाल्या प्रकाराची माहिती घेत व्हिडिओतील चार आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, उर्वरित तीन आरोपींच्या शोधासाठी तीन पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने एका पत्रकात दिली आहे.
जून महिन्यातील घटना...
पोलिसांच्या म्हणण्यानुसार वायरल व्हिडिओतील घटना जून महिन्यातील आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो, अपहरण, खंडणी, जिवे मारण्याचा प्रयत्न आदी गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. दरम्यान पीडित मुलगा अल्पवयीन असल्याने हा व्हिडिओ प्रसारित करण्याचे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहरात चर्चा आहे की...
दरम्यान लातूर शहरात चर्चा अशी आहे की, या (Minor Youth Assault Case) व्हिडिओतील मारहाण करणारे तरुण हे लातूर शेजारच्या रायवाडी परिसरातील आहेत. महाविद्यालयीन युवकांना व्याजाने पैसे देणारे हे सावकार असल्याची चर्चाही आता होत आहे. लातूरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे देत त्यांची लूट करणाऱ्या काही अशा लुटू-पुटू टोळ्या असल्याचीही चर्चा शहरात होत आहे. पोलिसाच्या तपासात नेमके काय पुढे येते? याची उत्सुकता लातूरकरांना आहे.