सेनगाव (Mhalsi Arena fire) : तालुक्यातील म्हाळशी येथील शेतशिवारात ३१ ऑक्टोबर शनिवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आखाड्याला लागलेल्या भीषण आगीत दुभती जनावरे, शेतीचे साहित्य आणि संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यात अल्पभूधारक शेतकरी प्रवीण उत्तम भुक्तर यांचे सुमारे ६ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच कमी पावसामुळे पिक उत्पादन घटलेले असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे भुक्तर यांच्यावर दूष्काळात तेरावा महिना अशी हताश परिस्थिती ओढावली आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर की प्रवीण भुक्तर यांची गावापासून दीड किलोमीटर अंतरावर चार ते पाच एकर शेती आहे. शेतातील आखाड्यावरच ते दुभती जनावरे पाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी दिवसभर शेतात काम केल्याने शेतकरी प्रवीण भुक्तर यांना ताप आला होता. त्यामुळे सायंकाळी ते औषधोपचारासाठी सहकुटुंब गावात आले होते. रात्री उशीर झाल्याने पती-पत्नी व दोन्ही मुले गावातच थांबली. १ नोव्हेंबर रविवारी रोजी पहाटे सहाच्या सुमारास भुक्तर आखाड्यावर गेले असता, संपूर्ण आखाडा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे उघडकीस आले. या आगीत दोन म्हशी, एक वघारू, सहा शेळ्या आणि एक कुत्रा यांचा होरपळून मृत्यू झाला.
याशिवाय ठिबक सिंचनाचे साहित्य, सोलर मोटार संच, कडबा, शेतीची अवजारे आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माकोडे, बीट जमादार राठोड, पोलीस पाटील, साबेर पठाण, ग्रामसेवक गणेश चोपडे, तलाठी ज्ञानेश्वर कापसे व भास्कर वाठोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.दरम्यान, ही आग मध्यरात्री नेमकी कशी लागली की कोणी अज्ञात इसमाने लावली, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत झालेल्या या भीषण नुकसानीमुळे भुक्तर कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले असून, शासनाने त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
शनिवारी दिवसभर शेतात राबलो, संध्याकाळी ताप आल्यामुळे औषध घेऊन कुटुंबासह गावातच थांबलो होतो. पहाटे शेतात आलो तर समोर सगळा राखरांगोळा दिसला.माझ्या डोळ्यांदेखत ज्या म्हशी-शेळ्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला पोट भरायला दूध-धंदा दिला, त्या बिचार्या मुक्या जनावरांचा जळून कोळसा झाला होता. शेतात पिक पाण्याचे हाल तर आधीच होते, त्यात आता राहता आखाडा, संसार व शेती उपयोगी साहित्य, एका रात्रीत माझं सगळं संपलंय, मी पार रस्त्यावर आलोय. सरकारने जर आता आम्हाला तातडीने मदत केली नाही, तर या संकटातून उभं राहणं माझ्यासारख्या अल्पभूधारकाला शक्यच नाही.
-शेतकरी प्रविण भुक्तर