Sengaon Bazar Samiti: सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संचालक भिकाजी अवचार यांची १ सप्टेंबर मंगळवार रोजी बिनविरोध निवड झाली.
सेनगाव (Sengaon Bazar Samiti) : सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संचालक भिकाजी अवचार यांची १ सप्टेंबर मंगळवार रोजी बिनविरोध निवड झाली. सभापतीपदासाठी अवचार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली.
बाजार समितीच्या (Sengaon Bazar Samiti) सभागृहात सभापती निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेचे अध्यक्षीय अधिकारी म्हणून सहाय्यक दुय्यम निबंधक अक्षय गुठे उपस्थित होते. सभापतीपदासाठी भिकाजी अवचार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षीय अधिकारी अक्षय गुठे यांनी अवचार यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर बाजार समितीच्या प्रांगणात नवनिर्वाचित सभापती भिकाजी अवचार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी समाजकल्याण माजी सभापती रुपाली पाटील गोरेगावकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या पाटील गोरेगावकर, हर्षवर्धन पाटील गोरेगावकर, शिवसेना जिल्हा समन्वयक दिनकरराव देशमुख, तालुकाप्रमुख संतोष देवकर, के. के. शिंदे, अप्पासाहेब देशमुख, अशोक ठेंगल यांच्यासह बाजार समितीचे संचालक, पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, भिकाजी अवचार यांच्या बिनविरोध निवडीमुळे बाजार समितीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून, आगामी काळात बाजार समितीच्या कामकाजाकडे शेतकरी व व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Sengaon Bazar Samiti) सभापतीपदी भिकाजी अवचार यांची बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी आजेगाव रोडवर जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली.