शेतकऱ्याचा ग्रामपंचायतीला अंतिम इशारा
मानोरा (Manora Panchayat Samiti) : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत वापटा (हट्टटी) अंतर्गत येणाऱ्या हट्टटी गावातील सार्वजनिक रस्त्यावरील व शासकीय जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण त्वरित निष्कासित करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही कारवाई केली नाही, त्यामुळे अखेर गावातील शेतकरी सुभाष रामजी चव्हाण यांनी दि. ३ नोव्हेंबर रोजी तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देऊन अंतिम कायदेशीर इशारा (अल्टिमेटम) दिला आहे. येत्या दि. १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अतिक्रमण हटविले नाही, तर पंचायत समिती कार्यालय, मानोरा येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हट्टटी गावामध्ये चंद्रशेखर तुळशीराम चौधरी यांच्या घरापासून ते हनुमान मंदिर परिसरापर्यंत, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हट्टटी ते संत सेवालाल महाराज मंदिरापर्यंतच्या सार्वजनिक व शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत व बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणामुळे सार्वजनिक रस्ते अरुंद झाले असून, शाळकरी मुले, महिला, वृद्ध आणि ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत गावामध्ये वाहन येण्यास देखील मोठा अडथळा निर्माण होत आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम ५३ अन्वये ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्याची कायदेशीर जबाबदारी व कर्तव्य हे पूर्णतः ग्रामपंचायत प्रशासनाचे आहे. परंतु, वारंवार तोंडी व लेखी विनंत्या करूनही प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई केलेली नाही, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. सदर निवेदनाद्वारे प्रशासनाला अंतिम इशारा देण्यात येतो की, हे अतिक्रमण तात्काळ हटविण्यासाठी पुढील ७ दिवसांचा आत, संपूर्ण अतिक्रमण कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून पूर्णपणे निष्कासित (हटविण्यात) करण्यात यावे.
जर विहित केलेल्या मुदतीत सदर अतिक्रमण हटविण्यात आले नाही, तर लोकशाही मार्गाने दाद मागून पंचायत समिती कार्यालय, मानोरा येथे आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या घटनेमुळे होणाऱ्या कोणत्याही अप्रिय घटनेची, जीवितहानीची तसेच कायद्याची जबाबदारी पूर्णपणे संबंधित ग्रामपंचायत प्रशासन, तालुका प्रशासन आणि महाराष्ट्र शासन प्रशासन यांची राहील, असाही इशारा देण्यात आला आहे. आता प्रशासन या गंभीर प्रकरणात मुदतीत कारवाई करते की, या शेतकऱ्याला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागतो, याकडे संपूर्ण हट्टटी व परिसराचे लक्ष लागून आहे.