मानोरा : तालुक्यातील आमगव्हाण येथील दोन व्यक्तींना भरधाव मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मानोरा-मंगरूळपीर महामार्गावर घडली.
या अपघातात अजय विष्णू चौधरी (वय ३२, रा. आमगव्हाण) यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश लांडे (वय ५२, रा. आमगव्हाण) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय चौधरी आणि प्रकाश लांडे हे दोघेही शेतातून घरी परतत असताना रस्त्याच्या कडेने पायी जात होते. याचवेळी मंगरूळपीरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाच्या चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवत दोघांना जोरदार धडक दिली.
अपघातानंतर दोघांनाही उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी अजय चौधरी यांना तपासून मृत घोषित केले. तर प्रकाश लांडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेने आमगव्हाण गावासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.