नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हिंगोली (Mahavitaran employee assaulted) : वीज बिल वाढवून दिले, ते कमी का करून देत नाहीत या कारणावरून महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या ३३ केव्ही उपकेंद्रातील कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना नर्सी नामदेव येथे घडली आहे. यात कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल प्रभाकर हुडीवाले, व्यवसाय नोकरी यंत्रचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी, ३३ केव्ही उपकेंद्र नर्सी नामदेव हे आपले कर्तव्य बजावत असताना दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास आरोपी शेख रऊफ शेख गौस रा. नर्सी नामदेव याने महावितरणच्या कार्यालयात येऊन लाईट बिल वाढवून दिल्याचे कारण सांगत वाद घातला.
आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तेथे हजर असलेले सय्यद अब्दुल इम्रान सय्यद अब्दुल हफीज यांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर करून गंभीर जखमी केले.
इतकेच नाही तर आरोपीने दुसऱ्या दिवशी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.२० वाजताच्या सुमारास पुन्हा कार्यालयात येऊन "माझे लाईट बिल कमी करून द्या, नाही तर एका-एकाला खुपसून मारून टाकतो, तू बाहेर निघ" अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
या (Mahavitaran employee assaulted) प्रकरणी फिर्यादी राहुल हुडीवाले यांच्या तक्रारीवरून नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दि. ९ ऑक्टोबर रोजी १६.२६ वाजता दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोउपनि दिघाडे हे करीत आहेत.