ST NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सवलतीच्या प्रवासाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दि. १ सप्टेंबर २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना सवलत
हिंगोली (ST NCMC Card) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सवलतीच्या प्रवासाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दि. १ सप्टेंबर २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना सवलतीचे तिकीट केवळ NCMC कार्डद्वारेच दिले जाणार आहे. याबाबतचे अधिकृत परिपत्रक महामंडळाच्या वाहतूक शाखेचे महाव्यवस्थापक यांनी दि. ३० जून २०२६ रोजी जारी केले आहे. हे परिपत्रक राज्यातील सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि सर्व विभाग नियंत्रकांना पाठवण्यात आले आहे.
महामंडळाने शासनाच्या निर्देशानुसार विविध सामाजिक घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली आहे. ही सुविधा अधिक पारदर्शक आणि कॅशलेस करण्यासाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली (ST NCMC Card) सुरू करण्यात आली आहे. या कार्डच्या नोंदणी आणि वितरणासाठी मे. ईबिक्स टेक्नॉलॉजिस कंपनी आणि एनएसडीएल पेमेंट बँकेच्या माध्यमातून राज्यातील सर्व आगार आणि बसस्थानकांवर अधिकृत एजंटची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक या प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी आणि वितरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
नवीन आदेशानुसार दि. ०१ सप्टेंबर २०२६ पासून या प्रवर्गातील लाभार्थ्यांना सवलतीचे तिकीट केवळ NCMC कार्ड दाखविल्यास आणि त्या कार्डमधूनच दिले जाईल. तसेच या कार्डचे टॉप-अप करण्याची सुविधा देखील बसमधील वाहकांमार्फतच उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासंदर्भातील संपूर्ण मानक कार्यप्रणाली महामंडळाने सर्व आगारांना पाठवली असून सर्व चालक, वाहक आणि वाहतूक नियंत्रकांना याबाबत सूचना देण्याचे आदेश दिले आहेत.
या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून दि. १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत एक कोटी एक लाखाहून अधिक प्रवाशांनी या कार्डसाठी नोंदणी केली असून जवळपास ६५ लाख कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत. दि. १५ ऑगस्टपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील शाळांमध्ये जाऊन नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे.
त्यामुळे ज्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी अद्याप NCMC कार्ड काढलेले नाही, त्यांनी आपल्या जवळच्या एसटी आगारात जाऊन तात्काळ नोंदणी पूर्ण करून घ्यावी, अन्यथा १ सप्टेंबरनंतर सवलतीच्या तिकिटाचा लाभ घेता येणार नाही आणि पूर्ण तिकीट आकारले जाणार आहे.