लातूर जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
लातूर (Latur Sexual assault case) : चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडवळ नागनाथ येथे अल्पवयीन मुलीला मोबाईल दाखवण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी चुंबल्या ऊर्फ रितेश राजनंद कसबे (वय २१ वर्षे, रा. वडवळ नागनाथ, ता. चाकूर, जि. लातूर) याला विशेष जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर यांनी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड ठोठावला. मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. ए. सय्यद यांनी दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी हा निकाल दिला.
९ फेब्रुवारी २०२५ रोजी आठ वर्षांची अल्पवयीन मुलगी इतर मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी आरोपीने मोबाईल दाखवण्याचे आमिष दाखवून तिला जवळ बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी चाकूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६५(२), ७४, ७५(२), ७६ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ (पोक्सो) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पंकज निळकंठे यांनी केला. (Latur Sexual assault case) तपासादरम्यान संकलित केलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सरकारी पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी पक्षाने तोंडी पुराव्यांसोबत त्यांना पुष्टी देणारे वैज्ञानिक पुरावेही न्यायालयासमोर सादर केले. या पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश आले.
सदर खटल्यात आरोपीने स्वतःवरील आरोपांतून बचाव करण्यासाठी पीडित मुलीच्या आईवरच लांच्छनास्पद आरोप करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे, साक्षीदारांच्या साक्षी आणि वैज्ञानिक पुरावे यांच्यापुढे आरोपीचा बचाव टिकू शकला नाही. न्यायालयाने आरोपीचा बचाव ग्राह्य न धरता त्याला दोषी ठरवले आणि २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात जिल्हा सरकारी वकील शिवकुमार गिरवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. मंगेश महिंद्रकर यांनी सरकारतर्फे प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना ॲड. सोमेश्वर बिराजदार, ॲड. विद्या वीर आणि ॲड. पल्लवी यादव यांनी सहकार्य केले.