तक्रार नोंदविण्याचे आरटीओंचे आवाहन
लातूर (Latur Regional Transport Office) : दिवाळी सणाच्या कालावधीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसकडून (टूरिस्ट बसेस/ट्रॅव्हल्स) केली जाणारी मनमानी भाडेवाढ आणि प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ०१ नोव्हेंबर २०२६ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
दिनांक २७ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या टप्पा वाहतूकचे दिनांक १८ जुलै २०२६ रोजी झालेली भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने विहित केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची तपासणी करून दोषी आढळलेल्या वाहनांविरुद्ध मोटर वाहन कायदा व अनुषंगिक नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे निर्देश वायुवेग पथकातील नियुक्त सर्व मोटर वाहन निरीक्षक तथा सहायक मोटर वाहन निरीक्षक यांना देण्यात आले आहेत.
एस. टी. महामंडळाद्वारे आकारण्यात येणाऱ्या प्रवासी भाड्याच्या जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारणी करण्याची मुभा खाजगी प्रवासी बस यांना आहे. त्यापुढे भाडे आकारणी करणे हे अत्यंत अवाजवी आहे. तरी खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसद्वारे अवाजवी किंवा मनमानी भाडे वसूल होत असल्यास प्रवाशांनी प्रवासाचा तपशील, वाहनाचा तपशील आणि आकारण्यात आलेल्या तिकीटाच्या पुराव्यासह आपली तक्रार लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या rto.24-mh@gov.in या ईमेल आयडीवर दाखल करावी. जेणेकरून संबंधित बस परवान्यावर मोटर वाहन कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करणे सुलभ होईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.