Latur Municipal Protest: लातूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्या कक्षामध्ये पालिका नगररचना विभागाचे प्रमुख अक्षय तळदकर यांना झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ
लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात समन्वयाची जबाबदारी आयुक्त व महापौरांवर!
लातूर (Latur Municipal Protest) : लातूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्या कक्षामध्ये पालिका नगररचना विभागाचे प्रमुख अक्षय तळदकर यांना झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ कालपासून महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत बंद अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी दुपारी स्थगित करण्यात आला. महापौर व महापालिकेचे आयुक्त यांच्या प्रमुख सहभागाने समन्वय समिती स्थापन करून त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारी द्याव्यात, या अटीवर हा बंद स्थगित करण्यात आला.
लातूर महापालिकेत (Latur Municipal Protest) सोमवारी दुपारी साडेचार च्या सुमारास अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्या कक्षामध्ये नगररचना विभागाचे प्रमुख अक्षय तळदकर यांना नगरसेवक अतिष चिकटे, सचिन गायकवाड, विकास वाघमारे व मनोज थोरात यांनी मारहाण केल्याचा आरोप दस्तूर खुद्द महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जाधव यांनी केला. याबाबत नगरपंचायत नगरपालिका कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटने कडे जाधव यांनी तळदकर यांना मारहाण झाल्याची तक्रार केल्यानंतर मंगळवारी महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंदचा एल्गार करीत आंदोलन पुकारले. यामुळे लातूर महापालिकेचे कामकाज ठप्प झाले. दरम्यान मंगळवारी सायंकाळपर्यंत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी तसेच महापौर महापालिकेचे पदाधिकारी व महापालिकेचे अधिकारी यांच्यामध्ये बेमुदत बंद मागे घेण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र सकारात्मक चर्चा होऊ नये कर्मचाऱ्यांच्या वतीने बुधवारी ही बेमुदत बंद सुरूच ठेवण्यात आला होता.
बुधवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जवळेकर, महापौर जयश्रीताई सोनकांबळे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देत समन्वयाने मार्ग काढण्याचा निर्धार बोलून दाखविला. लोकप्रतिनिधी व अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकमेकांना सन्मान द्यावा, एकमेकांचा आदर करावा, यावर सर्वांचे एकमत ठरले. यापुढे जर असा प्रकार घडला तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, या अटीवर अखेर कर्मचारी अधिकाऱ्यांचे हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी आयुक्त राहुल कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त पंजाबराव खानसोळे, वसुधा फड तसेच विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन दिवसांच्या तणावानंतर संवादाचा मार्ग स्वीकारत आंदोलन स्थगित करण्यात आल्याने महापालिकेचे कामकाज पुन्हा सुरू झाले.
ही सगळी जबाबदारी...
या (Latur Municipal Protest) आंदोलनात दोन्ही बाजूंमध्ये संवाद घडवून आणण्याची जबाबदारी आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी जवळगेकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्यावर सोपविली होती. त्यानुसार अभय साळुंखे यांनी यावेळी बोलताना 'भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात परस्पर सन्मान आणि सुसंवाद राखला जाईल, अशी स्पष्ट हमी दिल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.