लातूर विभाग एस.टी. बस

डिझेलअभावी थांबली एस.टी.ची चाके; बसगाड्यांना दोन ते तीन तासांचा विलंब, प्रवाशी व विद्यार्थ्यांचे हाल

Latur Division ST. Bus: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागातील निलंगा आगाराचा डिझेल पंप गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बंद असल्याने आगाराच्या कामकाजावर विपरित परिणाम

डिझेलअभावी थांबली एस.टी.ची चाके; बसगाड्यांना दोन ते तीन तासांचा विलंब, प्रवाशी व विद्यार्थ्यांचे हाल

Latur Division ST. Bus

लातूर (Latur Division ST.  Bus) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागातील निलंगा आगाराचा डिझेल पंप गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बंद असल्याने आगाराच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. डिझेल भरण्यासाठी निलंगा आगारातील बसगाड्यांना अन्य आगारांवर अवलंबून राहावे लागत असून, काही वेळा दोन ते तीन तासांचा विलंब होत आहे. याचा थेट परिणाम प्रवासी वाहतूक, विद्यार्थ्यांची ये-जा आणि आगाराच्या उत्पन्नावर होत असल्याचे चित्र आहे.

लातूर विभागात लातूर, अहमदपूर, उदगीर, औसा आणि निलंगा असे पाच आगार आहेत. यापैकी निलंगा आगारातील डिझेल पंप अनेक महिन्यांपासून बंद असल्याने येथील बसगाड्यांना डिझेल भरण्यासाठी लातूर, उदगीर किंवा औसा आगारावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे बसगाड्यांचा वेळ वाया जात असून, नियोजित फेऱ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, लातूर, उदगीर, अहमदपूर आणि औसा आगारांना पूर्वी सोलापूर येथील इंडियन ऑइल कंपनीकडून डिझेलचा पुरवठा होत होता. मात्र, केवळ १८ पैसे प्रतिलिटरची किंमत कमी पडत असल्याच्या कारणावरून गुजरातमधील सुरत येथून डिझेल मागविले जात असल्याची माहिती समोर येत आहे. लांब अंतरावरून होणाऱ्या या पुरवठ्यामुळे डिझेल वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, काही बसगाड्यांना डिझेलअभावी थांबवून ठेवण्याची वेळ येत आहे.

एका बाजूला डिझेल पुरवठ्यातील अनियमितता आणि दुसऱ्या बाजूला निलंगा आगारातील पंप बंद असल्याने येथील वाहतूक व्यवस्थेवर दुहेरी संकट ओढवले आहे. डिझेल भरण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ, इंधनासाठी होणारी धावपळ आणि बसगाड्यांच्या फेऱ्यांतील संभाव्य विलंब यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

पंप तातडीने सुरू करण्याची मागणी
निलंगा आगारातील डिझेल पंप तातडीने सुरू करून डिझेल पुरवठ्याचे नियोजन सुरळीत करावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय टाळावी, तसेच निलंगा आगाराच्या उत्पन्नावर होणारा परिणाम रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टैग्स: Latur Division ST Bus