लातूर जिल्ह्यात राजकीय सुसंस्कृतपणाला लावले भुसनाळे!
लातूर (Latur District Bank Election) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक मैदानात सध्या होत असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरींनी मतदार, सोसायट्यांचे चेअरमन आणि शेतकऱ्यांची मोठी करमणूक होत असून निवडणुकीच्या मैदानात AI चा चिखल मोठ्या प्रमाणात निर्माण केला जात असल्याने लातूर जिल्ह्यात राजकीय सुसंस्कृतपणाला भुसनाळे लागले आहेत. निवडणुकीत नेमके आरोप कोणते करावे यापेक्षा नेमके कोणते आरोप करू नये, याचे भान नसलेले अनेक लोक निवडणुकीच्या मैदानात बेभान झाल्याने राजकीय सुसंस्कृतपणा धुळीस मिळत आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Latur District Bank Election) निवडणुकीत काँग्रेस व महायुती असे दोन पॅनल मैदानात उतरतील, अशी हवा निवडणुकीचा कार्यक्रम लागण्यापूर्वी जिल्ह्यात निर्माण केली गेली. वास्तविक जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षीय पॅनल पेक्षा वैचारिक पॅनल मैदानात उतरतील, अशी अपेक्षा होती. मात्र पक्षीय नाही आणि वैचारिकही नाही, मतभेदीही नव्हे, तर मनभेदी विचारांचे पॅनल मैदानात उतरले आहेत की काय? अशी शंका या प्रचारात उपस्थित होणाऱ्या क्लृप्त्यांमुळे लातूरकरांमध्ये उपस्थित केली जात आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Latur District Bank Election) देशमुखांची सत्ता आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ काम करते. राज्याच्या सत्ताधारी गटात असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील दिलीपराव देशमुख यांच्यासोबत जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात एकत्र आहेत. तर विरोधात माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार रमेश आप्पा कराड व इतर सहकाऱ्यांचे पॅनल उतरले आहे. निवडणुकीपूर्वीच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर माजी मंत्री संभाजीराव पाटलांनी जोरदार टीकास्त्र चालविले. सहकार मंत्री बदनाम कसे होतील, यासाठी पुरेपूर यंत्रणा लावण्याचे काम त्यांच्याच पक्षातील काही सहकाऱ्यांसह त्यांच्याच सत्ताधारी गटातील पक्षाच्या नेत्यांनी लातूरमध्ये जोरदारपणे चालविले. सहकार मंत्री पाटील यांनी या मोहिमेला त्याच पद्धतीने जोरदार प्रत्युत्तर दिले.
मात्र गेल्या दोन दिवसांपासून लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या (Latur District Bank Election) निमित्ताने उमेदवारांच्या व्यतिरिक्त त्यांच्या समर्थकांनी सोशल माध्यमांमध्ये जोरदारपणे एकमेकांवर टीकास्त्र करणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ सोडणे सुरू केले आहे. यात AI चे व्हिडिओ करून टाकण्यात आले आहेत. आपल्या मनात जेवढी काही घाण साचली आहे, ती घाण अगदी निरपून बाहेर काढण्याइतपत या व्हिडिओमध्ये टीका-टिप्पणी करण्याची खालची पातळी गाठली गेली आहे.
लातूर जिल्ह्यात राजकीय कार्यकर्त्यांच्या विचाराची एक उंची निर्माण करण्याचे काम सातत्याने यापूर्वीपासून झालेल्या राजकीय नेतृत्वाने व सामाजिक नेतृत्वाने तयार केले आहे. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Latur District Bank Election) आपल्या विचारांची उंची अगदी मातीमोल करण्याचाच विडा काही उमेदवारांच्या समर्थकांनी उचलला आहे की काय? अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे.