वसमत तालुक्यातील पळशी येथील घटना
हिंगोली (Latur Crime Branch) : वसमत तालुक्यातील पळशी येथे लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घरफोडीतील आरोपीच्या अटकेसाठी २९ ऑक्टोंबरला आले होते. मध्यरात्री पोलिस पथकावर अचानक हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याने हट्टा पोलिसात ८ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, लातूर जिल्ह्यामधील एका घरफोडीच्या गुन्ह्यात वसमत तालुक्यातील पळशी येथील एका आरोपीचा सहभाग असल्याने २८ ऑक्टोंबर बुधवार रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांच्यासह सहा कर्मचार्यांचे पथक पळशी येथे आले होते. पहाटेच्या सुमारास पोलिसांचे पथक दाखल झाल्याचे कळताच अचानक काही जणांनी लोखंडी रॉडसह लाकडाच्या दांड्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.
यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांच्यासह काही पोलिस कर्मचारी जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच हट्टा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते यांच्यासह जमादार कृष्णा चव्हाण, शिवा पतंगे, अविनाश राठोड, गणेश सुर्यवंशी, संदिप चव्हाण, भारशंकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी पोलिसांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. या (Latur Crime Branch) प्रकरणात हट्टा पोलिस ठाण्यात लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमर सुरेश केंद्रे यांनी २९ ऑक्टोंबरला पहाटे ५.४७ वाजता फिर्याद दिली. ज्यामध्ये लातूर गुन्हे शाखेचे राजू मोहन शिंदे याला अटक करण्याकरीता आले असता आरोपींनी हातात लाठ्या काठ्या व लोखंडी रॉड घेऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने सपोनि पांडुरंग माने यांच्या डोक्यात मारून जखमी केले.
केंद्रे यांच्या डोक्यात काठीने मारून जखमी केल्यानंतर इतर पोलिस अंमलदारांना काठीने मारून त्यांच्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकून शासकीय वाहनावर दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडून १० हजार रुपयाचे नुकसान केले. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने विक्की मोहन शिंदे, सुदर्शन मोहन शिंदे, सचिन मोहन शिंदे, राजू मोहन शिंदे यासह इतर तीन ते चार महिला व पुरूष रा. पळशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्ह्यातील आरोपीच्या अटकेसाठी दोन पथके तैनात करण्यात आले आहेत.