मुख्य मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन
लातूर (Latur Cooperative Bank) : महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि मी स्वतः १९८७ साली या बँकेवर संचालक म्हणून आलो. पूर्ण ताकदीने उभी राहिलेली ही बँक आज गेल्या ४० वर्षांमध्ये केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकाची बँक म्हणून नावारूपाला आली आहे. हे यश आपल्या सगळ्यांच्या कष्टामुळेच शक्य झाले असून, ग्रामीण भागातील लाखो लोकांच्या जिव्हाळ्याशी ही बँक जोडली गेली आहे. आमची कमिटमेंट आणि बांधिलकी फक्त शेतकरी सुखासाठीच आहे, असे प्रतिपादन बँकेचे मुख्य मार्गदर्शक व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Latur Cooperative Bank) ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते शेतकरी सभासदांना संबोधित करत होते. यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, बॅंकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, अशोकराव पाटील निलंगेकर, रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, अशोक गोविंदपुरकर, एन.आर. पाटील, विजयकुमार पाटील व सर्व संचालक आदींची उपस्थिती होती.
बँकेशी जोडलेल्या प्रत्येक सोसायटी कार्यालयाला एक 'टीव्ही सेट' भेट देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. बँक कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस देण्याची आणि मूळ पगारामध्ये १० टक्के वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच, गटसचिवांना २५ टक्क्यांचा बोनस यावेळी दिलीपराव देशमुख यांनी जाहीर केला. आपल्या प्रास्ताविक भाषणात अध्यक्ष धिरज देशमुख यांनी बँकेचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सभेच्या शेवटी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव यांनी आभार मानले.
आम्ही दोघेही आयुष्यभर बँकेसोबत : सहकार मंत्री
"लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज सहकार क्षेत्रात जी उत्तुंग प्रगती केली आहे, ती निव्वळ कागदावरील आकडेवारी नसून बँकेच्या पारदर्शक व्यवस्थेची आणि चोख कारभाराची जिवंत पावती आहे. दिलीपराव देशमुख यांनी मला सहकारात पहिली संधी दिली, ज्यामुळे मला बँकेचा व्हाईस चेअरमन, चेअरमन म्हणून काम करता आले. त्यांच्या याच पाठबळामुळे आज मला राज्याचा सहकार मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. मी आणि दिलीपरावजी या बँकेचे मायबाप आहोत. आम्ही दोघेही आयुष्यभर या बँकेसोबत आणि शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे राहणार, अशी ग्वाही महाराष्ट्राचे सहकार मंत्री तथा बँकेचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब पाटील यांनी दिली.