Latur Construction Permit: लातूर शहरात लो रिस्क कॅटेगिरी व मॉडरेट रिस्क कॅटेगिरी बांधकाम परवानाबाबत ऑनलाईन बीपीएमएस प्रणालीद्वारे युडीसीपीआर नुसार अंमलबजावणी करण्याचा निर्णय
बीपीएमएस प्रणालीद्वारे युडीसीपीआरनुसार 'लो रिस्क कॅटेगिरी' व 'मॉडरेट रिस्क कॅटेगिरी' बांधकाम परवाना अंमलबजावणी
लातूर (Latur Construction Permit) : लातूर शहरात लो रिस्क कॅटेगिरी व मॉडरेट रिस्क कॅटेगिरी बांधकाम परवानाबाबत ऑनलाईन बीपीएमएस प्रणालीद्वारे युडीसीपीआर नुसार अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाल्याने शहरातील सर्वसामान्य व गोरगरिबांना घर बांधकामासाठी आता बँकांकडून अर्थसहाय्य उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे या घटकाला आता घर बांधणे सोयीचे व सुकर झाले आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी अखेर लातूर शहरात झाली असून शहरातील सर्वसामान्यांना ही सुविधा मिळावी, यासाठी लातूर येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव तसेच काँग्रेसचे तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांनी सातत्याने यशस्वी पाठपुरावा केला.
लातूर महानगरपालिकेच्या वतीने 10 ऑगस्ट 2026 पासून शहरात लो रिस्क कॅटेगिरी व मॉडरेट रिस्क कॅटेगिरी बांधकाम परवाने सुरळीतपणे ऑनलाईन बीपीएमएस प्रणालीद्वारे चालू करण्यात आले आहेत. लातूर महानगरपालिकेच्या नोंदणीकृत अर्किटेक्ट व सिव्हील इंजिनीअर यांनी युडीसीपीआरच्या नियमानुसार प्रस्ताव दाखल करण्यात यावे, असे परिपत्रक लातूर महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी काढले आहे.
क्रेडाई असोसिएशनचे अध्यक्ष, ए.ए.सी.ई. असोसिएशन अर्किटेक्ट & सिव्हील इंजिनीअरचे अध्यक्ष, ए.सी.ई.ए. असोसिएशन कंन्सटींग इंजिनीअर & अर्किटेक्टचे अध्यक्ष, आय.आय.ए. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अर्किटेक्ट रा. लातूरचे अध्यक्ष व सर्व नोंदणीकृत अर्किटेक्ट व अभियंता, लातूर यांना अतिरिक्त आयुक्तांनी या पत्रानुसार आदेश दिले आहेत.
महापालिका आयुक्तांनी 8 डिसेंबर 2025 रोजी शहरात लो रिस्क कॅटेगिरी व मॉडरेट रिस्क कॅटेगिरी बांधकाम परवाने देण्याचा आदेश काढला होता. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव यांनी याबाबत महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. इतकेच नव्हे, तर याबाबतची अंमलबजावणी तात्काळ न केल्यास स्वातंत्र्य दिनी प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर अखेर महापालिकेने याबाबत अंमलबजावणीसाठी हे परिपत्रक काढले आहे.
बँकांनाही काढले पत्र...
दरम्यान लातूर महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी मंगळवारी (दि.25) लातूर शहरातील सर्व बँकेच्या मॅनेजर व प्रबंधकांसाठी पत्र दिले असून (Latur Construction Permit) लातूर शहरात लो रिस्क कॅटेगिरी व मॉडरेट रिस्क कॅटेगिरी बांधकाम परवानाबाबत ऑनलाईन बीपीएमएस प्रणालीद्वारे युडीसीपीआर नुसार अंमलबजावणी करण्याचा निर्णय झालेला आहे. त्यानुषंगाने परवानाधारक अभियंता, आर्किटेक यांनी प्रस्तावाची छाननी करुन प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया दि. 10 ऑगस्ट 2026 पासून चालू करण्यात आली आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे अशा बांधकामासाठी कर्जासाठी आवश्यक इतर बाबींच्या पूर्ततेच्या अधिन राहुन कर्ज देणे कायदेशीर दृष्ट्या योग्य राहील, असे या पत्रात अतिरिक्त आयुक्तांनी म्हटले आहे.