स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचा पुढाकार
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतीवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी सामंजस्य करार
अमरावती (Late Bhanutai Gadkari Rural Development Organization) : पेट स्कॅनची सुविधा अमरावती शहरात नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांना नागपूर किंवा अन्य मोठ्या शहरामध्ये जावे लागत असे. परंतू ही सुविधा जिल्ह्यातील रूग्णांना अत्यंत माफत दरात उपलब्ध व्हावी यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि स्व.भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे. महाविद्यालयात अत्याधुनिक लोकोपयोगी डायग्नोस्टिक सेंटरची उभारणी स्व.भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने करण्यात येणार असून या ठिकाणी पेट स्कॅन, सिटी स्कॅन, एमआरआय अशा सर्व प्रकारच्या अत्याधुनिक चाचण्यांची सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पश्चिम विदर्भातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कोविड काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने उभ्या झालेल्या ऑक्सिजन प्लांटपासून ते आजच्या काळात अनेक आधुनिक उपचाराची सुविधा डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने दिली जाते. भविष्यात भव्य अशा कॅन्सर हॉस्पीटलची देखील संकल्पना महाविद्यालयाच्या परिसरात पूर्णत्वास जाणार आहे.'

अशातच आता ज्या सुविधा अमरावती शहरात सहजपणे मिळत नाही अशा पेट स्कॅन तसेच अन्य अत्याधुनिक डायग्नोस्टिक सुविधा नागरिकांना अत्यल्प दरात मिळाव्या यासाठी स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्ष कांचन नितीन गडकरी यांनी स्वत: पुढाकार घेऊन श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रूग्णालय व महाविद्यालयात हे सेंटर चालविण्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार केला आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वात संस्थेने देखील यासाठी पुढाकार घेतला आहे.
आज या करारावर हस्ताक्षर करतेवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचन गडकरी यांच्यासह स्व, भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचे सचिव अविनाश घुशे, श्रीकांत गडकरी, हेमंत गडकरी, दिलीप धोटे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य श्री हेमंत काळमेघ, सचिव डॉ.वि.गो.ठाकरे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ए.टी.देशमुख, तसेच प्रकल्पासाठी परिश्रम घेणारे अतुल मंडलेकर, राम जोशी,आर्किटेक्ट चिचघरे, ॲड संदीप शास्त्री, डॉ.केडिया, स्वप्नील पोतदार, संस्थेचे आजीवन सदस्य डॉ. बबन चौधरी, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय नागपूरचे प्राचार्य डॉ.ओमराज देशमुख, प्रा.आर.वाय.देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.