Kotgula Taluka: पारंपरिक इलाखा ग्रामसभा क्षेत्र कोटगुलअंतर्गत येणाऱ्या ३० गावांच्या विविध विकासकामांसह शेतकरी, शिक्षण, आरोग्य आणि रस्त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसभेच्या वतीने..
पारंपरिक इलाखा ग्रामसभेची नायब तहसीलदारांकडे मागणी; रस्ते, आरोग्य, शिक्षण व शेतकरी प्रश्नांकडे वेधले लक्ष
कोरची (Kotgula Taluka) : पारंपरिक इलाखा ग्रामसभा क्षेत्र कोटगुलअंतर्गत येणाऱ्या ३० गावांच्या विविध विकासकामांसह शेतकरी, शिक्षण, आरोग्य आणि रस्त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसभेच्या वतीने नायब तहसीलदारांकडे २३ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. कोटगुलला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, ही प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कोटगुल (Kotgula Taluka) परिसरातील बहुतांश गावांमध्ये शेतकरी व शेतमजूर मोठ्या प्रमाणावर राहतात. दुर्गम व आदिवासीबहुल भाग असल्याने मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामसभेने निवेदनात नमूद केले आहे.
ग्रामसभेने सामूहिक व वैयक्तिक वनहक्क पट्टे मिळावेत, शेतकऱ्यांना पीकविमा व सन २०२४-२५ मधील दुष्काळी मदतीची रक्कम मिळावी, पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम व हेक्टरी बोनस द्यावा, तसेच बंद झालेल्या पीएम-किसान योजनेची रक्कम मिळावी, अशा मागण्या केल्या आहेत. वृद्ध व विधवा लाभार्थ्यांना पेन्शन मिळावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
रस्ते, पूल व खडीकरणाची मागणी
कोटगुल परिसरातील (Kotgula Taluka) विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पिटेसुर-अलांडी-कामेली, गजेगाव-नागपूर, कोटगुल-कोसमी, कोटगुल-मकरघोडा, एडजाल-परतापगड, अमरईटोला-मोटाटोला-रामटोला, पिटेसुर-पुतनगोंदी, कोसमी-अंतागड आणि तुरमुळ-टेकामेटा आदी मार्गांवर रस्ते, पूल, खडीकरण व डांबरीकरणाची कामे करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिक्षण व आरोग्य सुविधांवरही भर
कोटगुल क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षकांची पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे. कोटगुल येथील मंजूर ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम तातडीने सुरू करावे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणीही ग्रामसभेने केली आहे. तसेच डोंगराळ व दुर्गम भागातील शासकीय कार्यालयांमधील रिक्त पदे भरण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कोटगुलला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळाल्यास परिसरातील ३० गावांतील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी होणारी गैरसोय कमी होईल, असे ग्रामसभेचे म्हणणे आहे.
पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती
नायब तहसीलदार यांना निवेदन देताना पारंपरिक इलाखा ग्रामसभा कोटगुलचे अध्यक्ष श्रावण मातलाम, उपाध्यक्ष दिलीप दाऊसिंग कोवाची, कोषाध्यक्ष रंजित मडावी, सचिव नारदभाऊ फुलारे यांच्यासह ग्रामसभेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ग्रामसभेच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन कोटगुल परिसरातील ३० गावांच्या विकासाला गती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.