३७ व्या वार्षिक सभेत १० ठरावांना मंजुरी : ४ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट
औसा (Killari Factory Modernization) : कारखान्याचे सुमारे ८५ टक्के आधुनिकीकरण पूर्ण झाले असताना दुसरीकडे कारखान्याचे आधुनिकीकरण करण्याचा ठराव निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सभेच्या विषयपत्रिकेवरील १० ठरावांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. कारखान्याचे आधुनिकीकरण, कार्यक्षेत्र विस्तार, भागभांडवल वाढ, आगामी गाळप हंगामाचे नियोजन आणि किल्लारी येथे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) सुरू करण्यासाठी शासनाकडे मागणी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.२८) वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. एनसीडीसी कर्जाच्या अटींनुसार विशेष लेखापरीक्षकांमार्फत वैधानिक लेखापरीक्षण करण्यास तसेच ई-ऑक्शनद्वारे झालेल्या स्क्रॅप विक्रीस कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.
कारखान्याची गाळप क्षमता १,२५० वरून २,५०० मेट्रिक टन प्रतिदिन करण्यात आली असून, यंदा ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊस तोडणीसाठी २२ हार्वेस्टर, ५० बैलगाड्या आणि अन्य वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्षेत्रात सुमारे १५ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
औसा व निलंगा तालुक्यातील लगतची ६१ गावे कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यास तसेच अधिकृत भागभांडवल ५२.५० कोटींवरून ६० कोटी रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली. किल्लारी कारखाना परिसरात कृषी विज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली असून, मंजुरी मिळाल्यास कारखान्याकडून १२ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सभेस प्रविण फडणीस, समृत जाधव, सुभाषराव जाधव, वैधानिक लेखापरीक्षक व्ही. व्ही. डोके, आकुसकर, संतोष मुक्ता, परिक्षीत पवार, राम पाटील, बळीराम पाटील, पतंगे, शिवाजीराव पाटील उत्लेकर यांच्यासह शेतकरी सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी ऊस निळकंठेश्वरला द्यावा : आ. पवार
आ. अभिमन्यू पवार म्हणाले की, कारखान्याचे सुमारे ८५ टक्के आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे. कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा असून, आपण विश्वस्त म्हणून काम करत आहोत. शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस निळकंठेश्वर कारखान्याला द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.