Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > आपले शहर > मराठवाडा

Kharif Crop

उमरगा तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील खरीप धोक्यात; पावसाअभावी शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात

उमरगा तालुक्यात गेल्या चाळीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे.


उमरगा तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील खरीप धोक्यात पावसाअभावी शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात

Kharif Crop |

गेल्या ४० दिवसांपासून पावसाची दडी; सोयाबीन, तूर, उडीद पिके संकटात, चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर

उमरगा : उमरगा तालुक्यात गेल्या चाळीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाअभावी वाढीच्या अवस्थेतील कोवळी पिके माना टाकू लागली असून, तालुक्यात पेरणी झालेल्या ७५ हजार ४१६ हेक्टरपैकी तब्बल ७० हजार हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा कर्जबाजारी होण्याचे संकट उभे राहिले आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन जवळपास एक महिना उशिराने झाले. त्यामुळे जूनमध्ये होणाऱ्या खरीप पेरण्या जुलैअखेरपर्यंत सुरू राहिल्या. पावसाची अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी खरीप पेरणी पूर्ण केली. तालुक्यात नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या पेरणीला शेतकऱ्यांनी मोठे प्राधान्य दिले. एकूण ५५ हजार ६०३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

तुरीचे पीक ११ हजार ७७४ हेक्टरवर, उडीद १ हजार ६४७ हेक्टरवर, तर मुगाची पेरणी १ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. मका आणि सूर्यफूल या तृणधान्यांची २३६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. मात्र, अपेक्षित पाऊस न झाल्याने संकरीत ज्वारी, बाजरी आणि पिवळा या पिकांच्या अपेक्षित पेरण्या झाल्या नाहीत.

ऑगस्टअखेर सरासरी २५८.३० मिमी पाऊस

उमरगा तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये ऑगस्टअखेरपर्यंत झालेल्या पावसाची नोंद पाहता उमरगा येथे २४६.३० मिमी, दाळींब येथे २०० मिमी, नारंगवाडी येथे २८८ मिमी, मुळज येथे ३१९.३० मिमी आणि मुरूम येथे २४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या विविध महसूल मंडळांमध्ये ऑगस्टअखेर सरासरी २५८.३० मिमी पाऊस झाला आहे.

तालुक्यात आतापर्यंत केवळ ६५.४९ टक्के पावसाची नोंद झाली असून, पिकांच्या निकोप वाढीसाठी आवश्यक पावसात ३४.५१ टक्के तूट आहे. तालुक्याची सरासरी पर्जन्यमानाची नोंद ९०० मिमी असताना त्याच्या निम्माही पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे खरीप पिकांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.

कडक उन्हासोबत वाहणाऱ्या कुंभारीमुळे वाढीला लागलेली कोवळी पिके दुपार धरू लागली आहेत. काही शिवारांमध्ये पाण्याअभावी पिके सुकत असल्याचे चित्र आहे.

पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी आणि विंधन विहिरींमध्ये जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे, ते शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत. स्प्रिंक्लर, ठिबक आणि तोटी पद्धतीचा वापर करून उपलब्ध पाण्याच्या साहाय्याने पिके वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चारा-पाण्याचा प्रश्न ऐन पावसाळ्यात गंभीर

पावसाचे उशिरा आगमन आणि जमिनीत अपेक्षित ओलावा नसल्याने मका, संकरीत ज्वारी आणि बाजरी यांसारखी जनावरांच्या चाऱ्यासाठी आवश्यक असलेली पिके घेणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे भर पावसाळ्यातच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

पाणी साठ्यात वाढ नाही

पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिने उलटून गेले असले तरी शिवारातील तलाव, साठवण तलाव, धरणे, विहिरी आणि विंधन विहिरींच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही. पावसाळा संपत आला असतानाही पाणीस्त्रोतांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने जनावरांसह शेतशिवारातील पशु-पक्ष्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे.

दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले

तालुक्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने बेरोजगारीत मोठी वाढ झाली आहे. शेतमजुरांना काम उपलब्ध होत नसल्याने रोजगाराच्या शोधात पुणे आणि मुंबईकडे स्थलांतर करणाऱ्या मजुरांची संख्या वाढली आहे. दुष्काळसदृश्य स्थिती आणि वाढती बेरोजगारी यामुळे तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येत आहे.

८१ हजारांहून अधिक पशुधन

उमरगा तालुक्यात २३ हजार ८१० गाय वर्गातील पशुधन आहे. म्हैस वर्गातील पशुधनाची संख्या १६ हजार ३९८ आहे. शेळी-मेंढ्यांची संख्या २९ हजार ७३५, तर गावरान कोंबड्यांची संख्या ११ हजार २२८ आहे. तालुक्यात एकूण ८१ हजार १७१ पशुधन आहे.

पावसाने उघडीप दिल्याने आणि उन्हाची तीव्रता वाढल्याने शेत-शिवारातील पशुधनासाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे.

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

गेल्या दीड महिन्यापासून ऐन पावसाळ्यात पाऊस गायब झाल्याने त्याचा परिणाम सर्वच व्यवस्थेवर झाला आहे. शेतकऱ्यांची बाजारातील पत कमी होत चालली आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सोयाबीन, तूर आणि उडीद यांसारखी नगदी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत करपून जात आहेत. त्यामुळे शेती व्यवसायासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मुळज येथील शेतकरी दत्ताजी चव्हाण यांच्यासह अन्य शेतकरी वर्गातून केली जात आहे.

शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात

खते, बी-बियाणे, पेरणी, खुरपणी आणि फवारणी यांसह शेतीच्या विविध कामांवर शेतकऱ्यांनी कर्ज काढून खर्च केला आहे. उत्पादनासाठी प्रति हेक्टर १५ ते २० हजार रुपयांपर्यंत खर्च झालेला आहे. मात्र, पिकांची सध्याची अवस्था पाहता कर्जाऊ रक्कम खर्च करूनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

शासनाने बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असली तरी सध्याची दुष्काळसदृश्य परिस्थिती कायम राहिल्यास बळीराजा पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related to this topic: