हिंगोली (Khanapur Chita Deer Rescue) : खानापूर चिता शिवारात शेतामध्ये सोयाबीनची मळणी सुरू असताना एक थरारक घटना घडली. रानटी कुत्र्यांनी एका हरणाच्या पिल्लाचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने अंधारात ते पिल्लू प्रकाशाच्या दिशेने मळणी यंत्राजवळ धावत आले.
ही बाब शेतात उपस्थित असलेले पठाण बशीर यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ मळणी यंत्र बंद केले आणि प्राणी मित्रांच्या मदतीने कुत्र्यांना हाकलून लावत पिल्लाची सुटका केली. यावेळी समाधान गाढवे, सोहेल पठाण, अभिषेक पातळे, ईशान पठाण आणि जमीर पठाण यांनी मोलाचे सहकार्य केले.
या (Khanapur Chita Deer Rescue) घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी संग्राम भालेराव, प्राणी मित्र रामप्रसाद जाधव खानापूरकर घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग हिंगोलीचे राजेंद्र नाळे, सचिन माने आणि अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार त्या हरणाच्या पिल्लाची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक वन अधिवासात सोडून देण्यात आले. वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका मुक्या जीवाचा जीव वाचला असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.