कयाधू नदी बचाव संघर्ष समिती

हिंगोली जिल्ह्यात तीन धरणे, पाणी मात्र जिल्ह्याबाहेर; आता कयाधूसाठी ८५ गावांचा एल्गार

Kayadhu River Rescue Struggle Committee: धरणांसाठी जमिनी हिंगोली जिल्ह्यातील, पाणीसाठ्याचा लाभ मात्र जिल्ह्याबाहेरील भागाला! येलदरी, सिद्धेश्वर आणि इसापूर या तीन धरणांशी संबंध असूनही हिंगोली...

हिंगोली जिल्ह्यात तीन धरणे, पाणी मात्र जिल्ह्याबाहेर; आता कयाधूसाठी ८५ गावांचा एल्गार

Kayadhu River Rescue Struggle Committee

 

सिंचनाचा १५ हजार १६० हेक्टरचा अनुशेष कायम
डॉ. रमेश शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती 

हिंगोली (Kayadhu River Rescue Struggle Committee) : धरणांसाठी जमिनी हिंगोली जिल्ह्यातील, पाणीसाठ्याचा लाभ मात्र जिल्ह्याबाहेरील भागाला! येलदरी, सिद्धेश्वर आणि इसापूर या तीन धरणांशी संबंध असूनही हिंगोलीच्या शेतकऱ्यांच्या वाट्याला सिंचनासाठी पुरेसे पाणी येत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. त्यातच आता जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कयाधू नदीचे पाणीही बोगद्याद्वारे वळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप कयाधू नदी बचाव संघर्ष समितीने केला आहे. नदीचे अस्तित्व आणि जिल्ह्याच्या पाण्यावरील हक्काच्या रक्षणासाठी ३ नोव्हेंबरला ८५ गावांतील ग्रामस्थ जल आंदोलनाच्या माध्यमातून एकवटणार आहेत.

कयाधू नदीचे पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित बोगद्याच्या मुद्द्यावर शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत डॉ. रमेश शिंदे यांनी भूमिका मांडली. हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष तब्बल १५ हजार १६० हेक्टरवर पोहोचला आहे. येलदरी धरणातून जिल्ह्याला केवळ आठ टक्के, सिद्धेश्वरमधून २८ टक्के, तर इसापूरमधून अवघे १५ टक्के पाणी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या धरणांतील बहुतांश पाणी जिल्ह्याबाहेर जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

आता कयाधूच्या पाण्यावरही घाला?
कयाधू नदीचे १००.४६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३.५४ टीएमसी पाणी २० किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्याद्वारे इसापूर धरणाकडे वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा समितीचा आरोप आहे. हा प्रकल्प झाल्यास ७७ किलोमीटर लांबीच्या कयाधू नदीच्या प्रवाहावर गंभीर परिणाम होऊन नदी कोरडी पडण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एकीकडे सिंचनाचा अनुशेष, दुसरीकडे घटते जलस्रोत आणि त्यात नदीचे पाणी वळविण्याचा प्रस्ताव, यामुळे जिल्ह्याच्या भविष्यातील पाणीप्रश्नाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील कयाधूचे पाणी पळविले जात असताना दोन खासदारासह निष्क्रिय आमदार मूक गिळून बसले आहेत असा आरोप शिंदे यांनी केला जिल्ह्याचा 15160 सिंचन अनुशेष बाकी असूनही त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. 950 कोटी रुपये खर्चातून बोगद्याचे काम करण्यात येत आहे.

परंतु प्रत्यक्षात पावणेदोन किलोमीटरच या बोगद्याचे काम झाले आहे. हा बोगदा जवळपास 20 किलोमीटर अंतराचा करण्याचा घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात 16 तालुके असून बारा तालुके सुजलाम सुफलाम आहेत उर्वरित चार तालुक्याला प्रगत करण्याकरता माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे हिंगोली जिल्ह्यातील कयाधूचे पाणी पळविण्याचा घाट घालत असल्याचा आरोपही रमेश शिंदे यांनी केला सद्यस्थितीत करण्यात येणारा बोगदा हा नियमबाह्य असून सर्व नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.या महत्त्वाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कयाधूचे पाणी वाचविण्यासाठी ८५ गावांतील ग्रामस्थांना सोबत घेऊन व्यापक आंदोलन उभारणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.

कयाधू नदी बचावसाठी ३ नोव्हेंबरला ८५ गावांचे भव्य जन-आंदोलन

हिंगोली - गेल्या दोन वर्षांपासून कयाधू नदी बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या लढ्याला आता अधिक तीव्र स्वरूप प्राप्त होणार आहे. येत्या ३ नोव्हेंबर २०२६ रोजी ८५ गावांच्या वतीने भव्य जन-आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सत्य परिस्थिती आणि संपूर्ण पुराव्यांसह माहिती देण्यासाठी गावनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

कयाधू नदी बचाव म्हणजेच आपले भविष्य वाचवा या संकल्पनेतून हा लढा सुरू आहे. ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तीव्र जल-आंदोलनाची भूमिका या बैठकीत स्पष्ट करण्यात येणार आहे. या संदर्भात 85 गावांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचा विषय कयाधू नदी बचाव - सत्य परिस्थिती व पुरावे हा असणार आहे. हिंगोली आणि सेनगाव तालुक्याचे पाणी वाचवण्यासाठी सत्य जनतेसमोर आणणे ही आजची सर्वात मोठी गरज असून या पाणी बचावाच्या लढ्याला सहकार्य करण्यासाठी सर्व गावकरी मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कयाधू नदी बचाव संघर्ष समिती, हिंगोलीचे डॉ. रमेश शिंदे यांनी केले आहे.