Kanwar Yatra Death: विदर्भातील कावड यात्रा श्रीक्षेत्र औंढा नागनाथाचे दर्शन करून शनिवार रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोलीकडे येत असताना डिग्रस कर्हाळे पाटीजवळ दोन कावडचे वाहन मागेपुढे..
हिंगोली (Kanwar Yatra Death) : विदर्भातील कावड यात्रा श्रीक्षेत्र औंढा नागनाथाचे दर्शन करून शनिवार रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोलीकडे येत असताना डिग्रस कर्हाळे पाटीजवळ दोन कावडचे वाहन मागेपुढे घेत असताना बसलेल्या धडकेत सोमनाथ भानावत (१९) हा भाविक अडकून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या श्रावण मासारंभ सुरु आहे. त्यानिमित्ताने विदर्भातून मोठ्या प्रमाणात कावड श्रीक्षेत्र औंढा नागनाथाच्या दर्शनाकरीता येत आहेत. २२ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील डव्हा येथील कावड परतीच्या मार्गावर येत होती. डिग्रस कर्हाळे पाटीजवळ दोन कावडच्या डिजेचा आवाज दणदणाट होता. यावेळी डिजेच्या वाहनचालकाने वाहन मागे घेतल्याने पाठीमागे असलेल्या दुसर्या डिजेच्या वाहनाला धडक बसली.
यावेळी दोन वाहनाच्या मध्ये सोमनाथ भानावत हा अडकून गंभीररित्या जखमी (Kanwar Yatra Death) झाला. त्याला तात्काळ हिंगोलीतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. रविवार २३ ऑगस्टला शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला. घटनास्थळी हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, सुधीर ढेंबरे, अस्लम गारवे, सलीम पठाण यांनी भेट दिली. या अपघाताबाबत रविवारी रात्री उशीरापर्यंत नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.