‘सह्याद्री जागा हो’ सभेत केंद्र व राज्य सरकारवर निशाणा; टोरंट प्रकल्पासह प्रस्तावित ऊर्जा प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह, २३ आणि २३६ प्रकल्पांचा उल्लेख
कर्जत येथील सायडोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. सह्याद्रीच्या परिसरात प्रस्तावित ऊर्जा प्रकल्प, खासगी कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या जमिनी, वाढती वृक्षतोड आणि डेटा सेंटरसाठी लागणारी वीज व पाणी या मुद्द्यांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात २३ प्रकल्पांसह नवीकरणीय ऊर्जेचे २३६ प्रकल्प प्रस्तावित असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकल्पांची गरज काय, त्यांचा फायदा कोणाला होणार आणि त्यासाठी पर्यावरणाची किती हानी होणार, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
वृक्षतोड पाहून अंत्ययात्रेला आल्यासारखे वाटले
कर्जत येथे प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे यांनी जाहीर सभेला संबोधित केले. सायडोंगर परिसरातील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड पाहून आपल्याला अंत्ययात्रेला आल्यासारखे वाटल्याचे त्यांनी सांगितले. झाडे तोडल्यानंतर परिसरातील पक्षी आकाशात घिरट्या घालत होते. त्यांची घरटी कोणी उद्ध्वस्त केली, असा प्रश्न जणू ते विचारत असल्याचे चित्र दिसत होते, असे त्यांनी नमूद केले. आज पक्ष्यांवर आलेली ही वेळ उद्या स्थानिक नागरिकांवरही येऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
टोरेंट हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात आज २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्जत येथे सभेला संबोधित केलं. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे म्हणल्यावर कर्जत येथे इंटरनेट बंद केलंय म्हणे. इंटरनेट बंद केलं म्हणून सूर्य उगवायचा थांबतो का? नुसतं कर्जतमध्ये बंद केलंय, पण बाकी अख्खं जग बघतंय. अर्थ्या तासात सगळं भाषण युट्युबवर पडेल मग सगळं जग बघेल. हे लोकं कोणत्या जगात जगतात तेच कळत नाही. मनात काळं असेल तर अशा गोष्टी करायच्या सुचतात. * आज सकाळी जंगलात जी झाडे तोडली आहेत ती बघायला गेलो होतो, तिथं लाकडं रचून ठेवली होती. तोडलेल्या झाडांची रचलेली लाकडं पाहून जंगलाच्या अंत्यसंस्काराला आल्यासारखं वाटलं. * हे राज्यात बसलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केंद्रात बसलेल्या दोघांकडून शून्य किंमत आहे. कोणता प्रकल्प करायचा, कसा करायचा हे सगळं दिल्लीत ठरतं. * मी पूर्वीपासून सांगत होतो, हा महाराष्ट्र जर या दोघांच्या हातात गेला तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हातात राहणार नाही. * आज तुम्ही रडत बसता आणि निवडणुकीच्या तोंडावर जातीच्या, धर्माच्या नावावर यांना मतदान करता. परत पुढचे पाच वर्ष रडत बसता. किती काळ हे चालू राहणार. * आमच्या लाडक्या बहिणींना १५०० रुपये देतायत. हे १५०० रुपये देऊन तुमची तोंडं बंद केली जात आहेत. * त्यादिवशी मी मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकत होतो. मुख्यमंत्री निवेदनात म्हणाले, केंद्राने आणि एका खाजगी कंपनीने ठरवून आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर हा प्रकल्प सुरू झाला. हे सगळं केंद्रात ठरतं हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं. * सत्तेची भिती, पदाची भिती या भितीमधून या गोष्टी घडतात. हा असा गप्प, शांत राहणारा, मान खाली घालून चालणारा हा महाराष्ट्र? गुजरातमधली २ माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार? * आज मी जंगलात भेट दिली तेव्हा मला महिला भेटल्या. हात जोडून विनंती करत होत्या, आमचं जंगल वाचवा. तुमच्यावर हात जोडायची वेळ येते? तुमचे कोयते काय करतात अशावेळी ? * आज भीमाशंकरचा प्रकल्प आलाय. त्याचं टेंडर वगैरे काही नाही असाच देऊन टाकलाय. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत अशाच प्रकारचे एकूण २३ प्रकल्प येत आहेत. * यापुढे महाराष्ट्रात जे खाजगी प्रकल्प येत आहेत. त्यांना जे पाणी आणि वीज लागणार आहे त्याची तरतूद व्हावी यासाठीची पूर्वतयारी म्हणून हे प्रकल्प सुरू केले जात आहेत * या सगळ्यातून तुमचे मतदारसंघ फोडले जात आहेत असे प्रकल्प आले की तुम्ही आहात त्या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होणार. आणि तिथे दुसरे लोकं स्थायिक होणार. हे सगळं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. * सर्बियामध्ये तरुणांनी, तिथल्या जेनझीने सत्तापालट करून दाखवला. मी आधीही माझ्या भाषणांत सांगितलंय जेनझी या महाराष्ट्राच्या खेडापाड्यातसुद्धा आहे. तुम्ही कधी जागे होणार आहात? * तुम्ही जर शांत बसणार असाल तर मला तुमचं नेतृत्व नाही करायचं. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे म्हणायचं आणि पेटून उठायचं नाही याला काय अर्थ आहे? * गडचिरोलीत शेतीची सुपीक जमीन आणि जंगलातली झाडे कापून ती जमीन एका खाणीसाठी दिली. * जंगलातली झाडं जेव्हा तोडली तेव्हा त्या झाडावर राहणारे पक्षी वर हवेत घिरट्या घालत होते. ही घिरट्या घालायची वेळ पुढच्या काळात तुमच्यावरसुद्धा येणार आहे. * हे सगळे प्रकार, त्यासाठी केलेली आंदोलनं, मोर्चे हे तुम्ही निवडणुकीच्यावेळी लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर उपयोग काय या सगळ्या आंदोलनांचा? * ज्या सह्याद्रीत शिवछत्रपती खेळले, बागडले तो सह्याद्री आज महाराष्ट्राचेच लोक संपवत आहेत. आणि महाराष्ट्रातला नागरिक हताश होऊन बघत बसला आहे. याबद्दल शिवछत्रपतींना काय वाटत असेल, याचा एकदा विचार करा. * या सगळ्या अन्यायाविरोधात जर आपल्याला लढता येत नसेल तर परमेश्वरच वाचवू शकेल या महाराष्ट्राला. * शिवरायांनी आज्ञापत्रात सांगून ठेवलंय कोणतंही झाड कापले जाऊ नये. निदान त्या शिवछत्रपतींचं तरी ऐकणार आहोत की नाही आपण? * महावितरणचा IPO डिसेंबरमध्ये महाराष्ट्र सरकार लाँच करणार आहे. म्हणजे यापुढे तुमच्या घरात येणाऱ्या वीजेचा दर हे सरकार नाही तर एक खाजगी कंपनी ठरवणार आहे. * जिथे जिथे महाराष्ट्रावर संकट येईल तिथे महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे. हा महाराष्ट्र वेगवेगळा ठेऊन चालणार नाही नाहीतर यांना जे साध्य करायचंय ते साध्य होईल. * उद्या टोरंटचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याचं वितरण कसं होणार आहे? कुठे होणार आहे? कुणामार्फत होणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरकारने जरूर दिली पाहिजेत. * तुम्हाला मी आत्ता सांगतो, आज या गोष्टी तुम्ही हसण्यावारी नेत आहात. भविष्यात तुमची पोरं म्हणतील, माझा बाप नालायक निघाला. जेव्हा महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं तेव्हा लक्ष दिलं नाही. * जर तुम्ही जागे असाल आणि पेटून उठलात तर त्या एकाच गोष्टीला जगातलं कोणतंही सरकार घाबरतं.हे जर नको असेल तर लोण्यासारखे थंड बसा. * जर आपली जंगलं वाचवायची असतील तर शिवछत्रपतींचे आज्ञापत्र वाचा. महाराष्ट्रातला माणूस पेटून उठला या गोष्टीचा शिवछत्रपतींनाही आनंद वाटेल. * मी उद्योगधंद्यांविरोधातला माणूस नाही, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे हे माझंही मत आहे. पण महाराष्ट्राला काय हवं आहे हे महाराष्ट्रातल्या माणसांनी ठरवलं पाहिजे. दुसरं कोणी ठरवून चालणार नाही. * मला फक्त एवढंच सांगायचंय जिवंत रहा. जी लढाई करायचीय त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचंय. मी तुमच्या बरोबर आहे पण नेतृत्व तुम्हालाच करायचंय. मलाही बघायचं आहे, महाराष्ट्र जिवंत आहे की नाही. * शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर सुद्धा १२५ वर्षे या संपूर्ण हिंद प्रांतावर मराठ्यांनी राज्य केलं. तो मराठी माणूस आज शांत कसा बसलाय? * मला पोलिसांनाही सांगायचंय त्यांना साथ देऊ नका. तुम्हीही या महाराष्ट्राचे नागरिक आहात, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत. उद्या तुमच्याही घरावर टकटक होणार. राज ठाकरे ।
— Raj Thackeray (@RajThackeray) October 28, 2026
महाराष्ट्रात २३६ ऊर्जा प्रकल्प येत असल्याचा दावा
सभेत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील प्रस्तावित प्रकल्पांचा मुद्दा मांडला. सह्याद्रीच्या कुशीत २३ प्रकल्प प्रस्तावित असून, त्यातील काही प्रकल्प बाहेरील कंपन्यांशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये केंद्र सरकारशी संबंधित तीन प्रकल्पांचा तसेच अदानी हायड्रो, रिव्ह्यू हायड्रो पॉवर, मेघा इंजिनिअरिंग, जेएसडब्ल्यू, टाटा आणि टोरंट यांसारख्या कंपन्यांच्या प्रकल्पांचा उल्लेख त्यांनी केला.
याशिवाय, नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात वीज निर्मितीसाठी आणखी २३६ प्रकल्प येत असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकल्पांसाठी जंगलतोड आणि स्थानिक नागरिकांचे विस्थापन करण्याची वेळ का आणली जात आहे, तसेच महाराष्ट्रात नेमकी विजेची किती कमतरता आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
कोळशावर आधारित ४० वीज प्रकल्प येत असल्याचाही उल्लेख करत, एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन वीज प्रकल्प उभारण्यामागील उद्देश काय आहे, याचे स्पष्टीकरण मिळायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
डेटा सेंटरसाठी वीज आणि पाण्याची गरज?
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारले जात असल्यामुळे त्यांना लागणारी वीज आणि पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रकल्प राबवले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. जंगलातील झाडे तोडल्यानंतर त्या परिसरात वसाहती उभ्या राहतील आणि तेथे बाहेरील लोक येतील. या सगळ्या घडामोडी स्थानिक नागरिकांच्या हितासाठीच आहेत, असे समजण्याचे कारण नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रकल्पांसाठी जमिनी देण्याचे निर्णय स्थानिक नागरिकांच्या हिताचा विचार करून घेतले जात आहेत का, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. केंद्रातील नेतृत्वाकडून राज्य सरकारला आदेश दिले जातात आणि त्यानुसार जमिनी खासगी कंपन्यांना उपलब्ध करून दिल्या जातात, असा आरोपही त्यांनी केला.
‘तुमच्यातूनच सत्ताधाऱ्यांना हिंमत मिळते’
स्थानिक नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त करत राज ठाकरे यांनी मतदारांच्या भूमिकेवरही भाष्य केले. निवडणुकीच्या काळात जात, धर्म आणि पैशांच्या आधारे मते मिळवली जात असल्याने सत्ताधाऱ्यांना अशा निर्णयांची हिंमत मिळते, असे ते म्हणाले.
निवडणुकीत ३० ते ३५ टक्के मतदान विकत घेतले जात असल्याचा दावा करत त्यांनी १,५०० रुपयांच्या मदतीवरही प्रश्न उपस्थित केला. एवढ्या रकमेत किती काळ भागणार आणि त्यासाठी नागरिकांच्या भवितव्याशी तडजोड का करायची, असा सवाल त्यांनी केला.
जंगल, जमीन आणि स्थानिक नागरिकांच्या भवितव्याबाबत निर्णय घेताना नागरिकांचा आवाज महत्त्वाचा असला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आज २८ ऑक्टोबर कर्जत येथे टोरेंट कंपनीच्या वीज प्रकल्पासाठी जी बेसुमार जंगलतोड सुरु केली आहे त्या जागेला भेट दिली. गुजरातमधल्या एका कंपनीला काम मिळावं म्हणून हा सारा खटाटोप सुरु आहे . बाकी आज संध्याकाळच्या कर्जत येथील पोलीस ग्राउंडवरच्या सभेत सविस्तर बोलेनच. https://t.co/Zjmbk4l7Jz
— Raj Thackeray (@RajThackeray) October 28, 2026
‘तुमचे कोयते फक्त फांद्या छाटण्यासाठी आहेत का?’
जंगल वाचवण्याची मागणी करण्यासाठी काही महिला आपल्याला भेटल्याचे राज ठाकरे यांनी सभेत सांगितले. या वेळी स्थानिक नागरिकांनी जंगलाच्या संरक्षणासाठी अधिक ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन करत त्यांनी, ‘तुमचे कोयते काय फक्त फांद्या छाटण्यासाठी आहेत का?’ असा सवाल केला.
महाराष्ट्रातील जंगलांचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांच्या हक्कांसाठी जनतेने जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कर्जतमधील इंटरनेट बंदीवरूनही सरकारवर टीका
सभेच्या सुरुवातीला कर्जतमध्ये इंटरनेट सेवा बंद असल्याची माहिती एका तरुणाने राज ठाकरे यांना दिली. त्यानंतर त्यांनी भाषण थांबवून या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. इंटरनेट बंद केल्याने परिस्थिती बदलणार नाही, असे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली. भाषणाचा व्हिडिओ अर्ध्या तासात यूट्यूबवर पोहोचेल, असेही ते म्हणाले.
सरकारचे हेतू स्वच्छ असतील, तर इंटरनेट बंद करण्यासारख्या गोष्टी करण्याची गरज पडणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
अमित शाह यांच्यासह केंद्रातील नेतृत्वावर निशाणा
राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही उल्लेख करत प्रकल्पांशी संबंधित व्यक्तींवर टीका केली. मेहता यांच्यासारख्या व्यक्तींचा उल्लेख करत, कुऱ्हाडीचा आवाज ऐकू येतो; मात्र देवाच्या काठीचा आवाज येत नाही, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला.
महाराष्ट्राच्या जमिनी, जंगल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीबाबत निर्णय घेताना राज्यातील जनतेच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘सह्याद्री जागा हो’ सभेतून पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा
‘सह्याद्री जागा हो’ या टॅगलाइनखाली कर्जत येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. भीमाशंकरच्या जंगल परिसरातील वृक्षतोड आणि सायडोंगर येथील प्रस्तावित टोरंट प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही सभा आयोजित करण्यात आली होती. प्रकल्पांसाठी जंगलतोड, स्थानिक नागरिकांच्या हक्कांचा प्रश्न, डेटा सेंटरसाठी लागणारी वीज-पाणी व्यवस्था आणि महाराष्ट्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर या मुद्द्यांवर त्यांनी सरकारला जाब विचारला.
महाराष्ट्रातील मतदारसंघांचे स्वरूप बदलत असल्याचा दावाही त्यांनी केला. भविष्यात स्थानिक नागरिकांची लोकसंख्येतील हिस्सेदारी कमी होऊ शकते आणि इतरांची वाढू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आजच्या घडामोडींकडे दुर्लक्ष न करता जंगल, जमीन आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले.